भाजपच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असून बुधवारी जिल्ह्यातील देवळाली, मालेगाव बाह्य, सिन्नर, बागलाण व नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवाचा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चाचपणी होणार होती, ते उपस्थित न राहिल्याने पक्ष निरीक्षक, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पुढे नेली.
राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या बैठकीस पक्ष निरीक्षक बापू भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद पगार,माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, माणिकराव शिंदे, शहराध्यक्ष अर्जुन टिळे मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी तथा निरीक्षक वसंत वाणी यांच्या उपस्थितीत ही चाचपणी केली जाणार होती. परंतु, पहिल्या दिवशी त्यांनी दांडी मारली. त्याचे कारण मात्र समजू शकले नाही. बापू भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील सर्व मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. मतदारसंघ निहाय घेण्यात आलेल्या बैठकीत देवळाली मतदार संघ, मालेगाव बाह्य़, सिन्नर, बागलाण, नाशिक पश्चिम मतदारसंघ या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. इच्छुकांनी आपली बाजू मांडून विजयाचे दावे केले. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघातील लेखाजोगा मांडत अनेक सूचना केल्या.
या चाचपणीत देवळाली मतदारसंघात इच्छुकांची संख्या सर्वाधिक म्हणजे १६ आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात तीन जण इच्छुक आहेत तर सिन्नर मतदारसंघात ही इच्छुकांची तेवढीच संख्या आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सहा जण इच्छुक आहेत. सिन्नर मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने चाचपणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे आ. माणिक कोकाटे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे मतभेद सर्वश्रृत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी कोकाटेंना प्रचारासाठी राजी करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक झाली होती. ही सल मनात ठेवत या जागेवर चाचपणी झाल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या चाचपणीस सुरूवात
भाजपच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असून बुधवारी जिल्ह्यातील देवळाली, मालेगाव बाह्य, सिन्नर, बागलाण व नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.
First published on: 07-08-2014 at 08:15 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp started to take review of nashik assembly