नगर महापालिका व भिंगार छावणी मंडळाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केला आहे. काल रात्री उशिरा मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आ. अरुण जगताप व जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी ही माहिती दिली. छावणी मंडळाची निवडणूक राष्ट्रवादी प्रथमच पक्ष चिन्हावर लढवणार आहे.
याच बैठकीत पवार व पिचड यांनी शहर जिल्हाध्यक्षपदी माजी महापौर संग्राम जगताप यांची, तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले व अंबादास गारुडकर यांची नियुक्ती जाहीर करुन तसे पत्र दिले. संग्राम जगताप यांची निवड सर्व इच्छुकांनी मान्य केल्याचा दावा आ. जगताप व शेलार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी घुले, गारुडकर, सोमनाथ धूत आदी उपस्थित होते. नियुक्तीबद्दल शेलार यांनी तिघांचा सत्कार केला.
शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती का रेंगाळली होती, जगताप यांच्या नियुक्तीस दोन वेळेस स्थगिती का दिली गेली, दिलेली स्थगिती उठवण्यात आली का, या प्रश्नांची उत्तरे देण्याचे शेलार व जगताप यांनी टाळले. पदाची मागणी करणे प्रत्येकाचा अधिकार आहे, आता कोणतेही वाद नाहीत, यापुढे पदाधिकाऱ्यांत कोणतेही अंतर दिसणार नाही, सर्वजण एकत्रितपणे महापालिकेच्या निवडणुकीस सामोरे जातील व पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकवतील, असे शेलार यांनी सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष तरुण आहेत म्हणून ज्येष्ठ त्यांच्या सूचना कशा मानणार या प्रश्नावर बोलताना पक्षश्रेष्ठींनी जगताप यांच्याकडे जबाबदारी दिल्याने तसा विचार कोणी करणार नाही. महापौर म्हणून जगताप यांनी केलेले काम, त्यांच्याकडील तरुणांचा संच याचा पक्षाला फायदा होईल, असाही दावा शेलार यांनी केला.
राष्ट्रवादीची राज्य पातळीवर रिपब्लिकन पक्षाच्या गवई व गाडे गटाशी आघाडी आहे, त्यांनी महापालिका निवडणुकीत जागा मागितल्यास देण्यात येतील, अन्यथा स्वबळाच्या निर्णयात बदल होणार नाही, असे शेलार यांनी सांगितले.
‘लोकसभेचा कोणालाही शब्द नाही’
नगर जिल्ह्य़ाच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात पक्षाने कोणालाही शब्द दिलेला नाही, परंतु अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत, असे आपल्याला समजले आहे, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवारच निर्णय घेतील, शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या निर्णयात आता बदल होणार नाही, कोणी गडबड करु नये, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्य़ातील प्रमुख नेत्यांना स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा