खडकवासला मतदारसंघात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून बोध घेत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व शक्तिनिशी मैदानात उतरत चंदगड विधानसभेचा पोटनिवडणुकीचा गड सर केले. अपेक्षेप्रमाणे संध्यादेवी कुपेकर या विजयी झाल्याने राष्ट्रवादीची बाजू भक्कम बनली. तथापि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अतिशय कडवी झुंज देताना चंदगडकरांच्या मनावर ठसा उमटवत तब्बल दसपट मते वसूल करून आपल्या ताकदीची व भविष्यातील संघर्षांची चुणूक दाखवली. स्वाभिमानी व शिवसेना या लढतीत नगण्य वाटणाऱ्या पक्षांनी विजयी उमेदवारापेक्षा अधिक मते मिळवून सत्ताधाऱ्यांना हादरा दिला आहे. एकूण लढतीचे चित्र पाहता राष्ट्रवादीने गड जिंकला असता तरी सिंह गमावल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. नवसहस्रकात कोल्हापूर जिल्हय़ात पहिल्या महिला आमदार बनलेल्या संध्यादेवी कुपेकर यांना डोंगरकपारीत लपलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास अवघ्या दीड वर्षांत घडवून आणण्याचे कडवे आव्हानही या निमित्ताने उभे ठाकले आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. आतापर्यंत तीन वेळा कुपेकर यांनी गडहिंग्लज मतदारसंघावर वर्चस्व राखले होते. मतदारसंघाच्या फेररचनेत गडहिंग्लजचा अल्प  भाग आणि आजरा-चंदगड तालुके असा नवा मतदारसंघ आकाराला आल्यावर येथे कुपेकरांनी बाजी मारली. त्यांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीत संध्यादेवी कुपेकर यांनी यशाची कमान उंचावत ठेवत कुपेकर घराण्यात पाचव्यांदा आमदारकी खेचून आणली. बाबासाहेब कुपेकर यांच्या विकासकामाला प्रतिसाद देत मतदारांनी संध्यादेवी यांना विजयी केले. मात्र याचवेळी फारसे जमेत नसलेल्या स्वाभिमानीच्या पारडय़ात मतांचे दान भरभरून टाकले.     
चंदगड मतदारसंघात विजयी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खडकवासला मतदारसंघात मनसेचे गोल्डन मॅन आमदार रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. मात्र या मतदारसंघात सर्वशक्तिनिशी लढत देऊन राष्ट्रवादीवर पराभवाची आफत कोसळली होती. हा पराभव राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलाच झोंबला होता. पराभवाची पुनरावृत्ती चंदगडमध्ये होऊ नये, यासाठी सुरुवातीपासून राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतला होता. उमेदवारीवरून मतदारसंघात संघर्षांचे चित्र असताना पक्षाने संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ होण्याचा व त्याद्वारे विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता. विजयासाठी काही पण हे सूत्र ठेवत राष्ट्रवादीने मतदारसंघात बेरजेच्या राजकारणावर भर दिला. नरसिंग गुरुनाथ पाटील, भरमू सुबराव पाटील व गोपाळराव पाटील या चंदगडच्या पाटीलकीला एकत्रित केले. पारंपरिक प्रतिस्पर्धा असणारे जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्या पाठबळही मिळविले. आघाडीचा धर्म सांभाळत काँग्रेसही प्रचारात उतरली. अशी सारी भक्कम गोळाबेरीज केल्याने राष्ट्रवादीचा विजय दृष्टिपथात होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यापासून ते जिल्हय़ातील कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी प्रचारासाठी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. इतके सारे केल्याने कुपेकर या विजयी झाल्या. २५ हजारांचे मताधिक्य घेतल्याने कुपेकरांचा करिश्माही दिसून आला.    
कुपेकरांचा विजय हा राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्याला पोषक ठरणार आहे. पण याचवेळी राष्ट्रवादीने मतदारसंघात केलेली गोळाबेरीज पाहता प्रतिष्ठेला साजेशा नसल्याचेही जाणवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सात हजारांच्या आसपास मते मिळविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तब्बल दसपट मते मिळवून सर्वानाच तोंडात बोटे घालायला लावली आहेत. स्वाभिमानीचे राजेंद्र गडय़ान्नावर यांना मिळालेली ६८ हजार ३३९ मते ही विरोधकांची झोप उडविण्यास पुरेशी ठरली आहे. चंदगड आर्थिक सूत्रे एकवटलेला दौलत कारखान्यातील गैरव्यवहार व गडहिंग्लज साखर कारखाना यांच्या कारभाराचे वाभाडे काढत स्वाभिमानीने शेतकऱ्यांच्या मनात घर केले आणि त्याचे मतात रूपांतर घडवून आणले. खासदार राजू शेट्टी,प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या वक्तृत्वाच्या तोफेने विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फिरविले. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत आपले आव्हान कितपत कडवे असणार आहे, याची सलामीही घडवून आणली आहे. चंदगडसारख्या भागात स्वाभिमानीला नगण्य लेखले जात होते. पण तेथे इतक्या मोठय़ा प्रमाणात मते घेतल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे दिसत आहे.    
शिवसेनेचे सुनील शिंत्रे यांच्याकडून अपेक्षित असणारी लढत पाहायला मिळाली नाही. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात होणाऱ्या पहिल्या निवडणुकीत सेनेकडून प्रखरपणे मुकाबला होईल, असे वाटत होते. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. या मतदारसंघात उभ्या राहात असलेल्या एव्हीएच केमिकल कंपनीविरुद्ध शिवसेनेने आवाज उठवला होता आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी स्थानिक समस्यांविरुद्ध सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे शिंत्रे यांना २५ हजारांचा टप्पा ओलांडता आला. अन्यथा शिवसेनेत आयात झालेल्या शिंत्रे यांना इतकीही छेद घेणे शक्य झाले नसते. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने चंदगडचा गड सर केला असला तरी त्यावर पक्षाचे निशाण अव्याहतपणे फडकत ठेवणे ही मात्र कसोटी असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp won but impressive performance by swabhimani
Show comments