केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवासी केलेल्या भाडेवाढीला विरोध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेने ऐरोली रेल्वे स्थानकात तर वाशीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी तीव्र कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत भाववाढीविरोधात निषेध व्यक्त केला.
मोदी सरकारने रेल्वे प्रवासी भाडय़ात १४.२ टक्के वाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: चाकरमान्यांना आर्थिक भरुदड सोसावा लागणार आहे. मंगळवारी रेल्वे प्रशासनाने या भाडेवाढीतून मुंबईकरांची जरी मुक्तता केली असली तरी मुळात ही भाडेवाढ इतरांनाही परवडणारी नसल्याने संपूर्ण भाडेवाढ रद्द करण्याची मागणी माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक यांनी केली. रेल्वेचे विभागीय अधिकारी तसेच रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. २८ जूनपर्यंत सरकारने दिलेल्या मुदतीत भाडेवाढीचा निर्णय रद्द न झाल्यास संपूर्ण नवी मुंबईत रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाडय़ात करण्यात आलेली १०० टक्के दरवाढ मागे घेण्याची मागणी नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. सकाळी वाशी रेल्वे स्थानकात पनवेल -अंधेरी लोकल काँग्रेस कार्यकर्त्यांंनी अडवत आंदोलन केले. या आंदोलनात नवी मुंबई काँग्रेसच्या सहप्रभागी छाया आजगांवकर, जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, वाशी ब्लॉक अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत, रेल्वे सेवा सुरळीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी केलेल्या आंदोलनामुळे मात्र चाकरमान्यांचे हाल झाले.

Story img Loader