दिवंगत नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे येण्याचे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या मेळाव्यात स्पष्टपणे मिळाले. चंदगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांचीच उमेदवारी निश्चित होईल, असे या मेळाव्यातून दिसून आले. यापूर्वी संग्राम कुपेकर यांचे पुढे आलेले नाव आता मागे पडण्याची चिन्हे आहेत.
बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? यावरून गेले महिनाभर वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. प्रथम कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांचे नाव पुढे आले होते. मात्र पक्षांतर्गत वादामुळे ते मागे पडले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर रविवारी कुपेकर यांच्या कानडेवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर म्हणाल्या, पूर्वी दु:खाच्या अवेगात मी काय बोलले हे निश्चितपणे स्मरत नाही. पक्षनेते, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पुढील वाटचाल केली जाणार आहे, असे म्हणत त्यांनी आई संध्यादेवी कुपेकर याच उमेदवार असतील याचे संकेत दिले. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील यांची भाषणे झालीत. बी.एन.पाटील-हुबळीकर यांनी स्वागत केले. एम.जे.पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यातील निर्णयाकडे जिल्ह्य़ातील राजकीय धुरीणांसह सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा