आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका बघता विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात युवती, महिला आणि युवकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये १६ फेब्रुवारीला महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेपासून महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस आता युवती मेळाव्यानंतर महिलांचे मेळावे आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित केले असून जास्तीत जास्त महिला मेळाव्यात उपस्थित राहाव्या यासाठी जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मेळाव्याच्या पूर्वी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे जिल्ह्य़ातील महिला कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली असली तरी त्यांच्या दौऱ्याबाबत मात्र कुठलीही माहिती देण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला.
आगामी २०१४ निवडणुका बघता शक्तीप्रदर्शन म्हणून या मेळाव्याकडे बघितले जात असल्यामुळे जिल्ह्य़ातील आणि शहरातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी वार्डावार्डात मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मेळाव्याला जिल्ह्य़ातील १५ हजारपेक्षा जास्त महिला उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या महिन्यात अमरावतीला महिला मेळावा आयोजित करण्यात आल्यानंतर १४ फेब्रुवारी नागपूरला आणि त्यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्य़ात महिला मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. महिला मेळाव्यानंतर टप्याटप्याने राज्यातील विविध भागात युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कृषी मंत्री शरद पवार यांनी आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत यापूर्वीच दिल्यामुळे जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसात प्रयत्न सुरू केले आहे. नागपूर जिल्ह्य़ात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश मिळाले नसल्यामुळे मधल्या काळात जिल्ह्य़ाच्या कार्यकारिणीमध्ये अनेक बदल करण्यात आले. जिल्ह्य़ात नागपूर शहरात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने कार्यकारिणीमध्ये बदल करण्याचे संकेत मिळाले असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

Story img Loader