हजारो वर्षांचे पारंपरिक मूल्य असलेल्या मौल्यवान भारतीय कलेचे संवर्धन करणे ही नवीन पिढीची जबाबदारी असल्याचे मत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी व्यक्त केले. मध्य रेल्वेच्या संस्कृती अकादमीच्या वतीने आयोजित आंतर रेल्वे नृत्यस्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
शास्त्रीय आणि समूह या दोन गटांतील नृत्य प्रकारात २२ संघ व २५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. समूह नृत्यात पश्चिम रेल्वेने (जयपूर) प्रथम, तर डिझेल लोको मेटिक वर्क्‍स (पतियाळा) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. पूर्वतटीय रेल्वे (भुवनेश्वर) यांनी तिसरा क्रमांक मिळविला. विजेत्यांना महाप्रबंधक सुबोध जैन, मुख्य वाणिज्य व्यस्थापक शरद इंगळे, मुख्य कार्मिक अधिकारी ए. के. ब्राह्मो, भुसावळ विभागाचे व्यवस्थापक महेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेला प्रमाणपत्र देण्यात आले. वैयक्तिक नृत्य प्रकारात इंटिग्रल कोच फॅक्टरीची आर. अक्षया, उत्तर मध्य रेल्वे (अलाहाबाद)ची मधुरिमा गोस्वामी देव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान मिळविले. शास्त्रीय नृत्यात उत्तर रेल्वेची प्रियंका मल्होत्रा, दक्षिण-पश्चिम रेल्वेची व्ही. एन. अनंता यांनी पहिले दोन क्रमांक मिळविले. सांस्कृतिक अकादमीची सुरेखा दोशी, मुकेश गौतम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी रमादेवी यांनी आभार मानले.

Story img Loader