विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेगाव ते नागपूरदरम्यान सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणखी एक जलद पॅसेंजर गाडी सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असल्याने शेगावला लाखो भक्त नेहमी जात असतात. रस्ते मार्गाने प्रवास अत्यंत महाग झाला असल्याने अनेकांना रेल्वेनेच जाणे परवडते. त्यामुळे येथे थांबणाऱ्या प्रत्येक गाडीतून मोठय़ा संख्येने प्रवासी उतरतात आणि तेवढय़ाच संख्येने चढतातही. नागपूर ते शेगाव वा शेगाव नागपूर या प्रवासासाठी सकाळी नऊ ते मध्यरात्रीदरम्यान एक्स्प्रेस, मेल, अतिजलद अशा दहा ते बारा रेल्वे गाडय़ा आहेत. अमरावतीकडे तसेच वर्धामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या काही गाडय़ाही या मार्गावरून जात-येत असतात. नागपूरहून भुसावळपर्यंत एकमेव पॅसेंजर धावते. पहाटे पाच वाजता ती निघत असल्याने शेगावला जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना ती सोयीची ठरते.
मात्र, या जलद गाडय़ांचा प्रवासदर न झेपणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा रेल्वेला विसर पडला आहे. केवळ नागपूरहून जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना केवळ भुसावळ पॅसेंजरचा आधार आहे. अपवाद वगळता या गाडीला नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्याची गरज आहे. कुठलीही गाडी आली की या पॅसेंजरला थांबवल्या जाते. रेल्वे वाहतुकीची अडचण समजली तरी इतकीही सापत्न वागणूक देण्याची गरज नाही. ही गाडी सध्या साडेबारा वाजेपर्यंत शेगावला पोहोचते. ती अकरा वाजेपर्यंत पोहोचायलाच हवी, असा प्रयत्न रेल्वे यंत्रणेकडून व्हायला हवा. या पॅसेंजरशिवाय अमरावती तसेच वर्धाहून पॅसेंजर गाडय़ा धावत असल्यातरी नागपूरकडील सर्वसामान्य प्रवाशांसाठी आणखी एक जलद पॅसेंजर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्य गरीब प्रवाशांसाठी किमान दहा डब्यांची जलद पॅसेंजर मलकापूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्याची गरज आहे. मलकापूरहून सुटल्यानंतर ही गाडी सायंकाळी शेगावला व दुसऱ्या दिवशी सकाळी सहावाजेपर्यंत नागपुरात पोहोचायला हवी. रात्री दहा वाजता भुसावळ-नागपूर पॅसेंजर व मध्यरात्री सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडय़ा आहेतच. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आणखी एक जलद पॅसेंजर सुरू झाल्यास ती प्रवाशांच्या सोयीची ठरणार आहे.
अनारक्षित डबे वाढवावेत
इंधन आणि इतर गरज भागविण्यासाठी रेल्वेने हक्काने प्रवास दरवाढ हक्काने करून टाकली. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांठी प्रत्येक गाडीत अनारक्षित डबे आणि सुविधांचा अभाव अद्यापही कायमच आहे. रेल्वेने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची संख्या वाढविली. त्यात काही सुविधा दिल्या असल्या तरी त्या केवळ श्रीमंत प्रवाशांसाठीच आहेत. घरबसल्या ऑनलाईन आरक्षण करण्याची सोय केली. प्रवासाच्या आदल्या दिवशी तत्काल आरक्षण उपलब्ध करून दिले. तरीही अनेकांना आरक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकांना वेळेवर प्रवास करावा लागतो. त्यातच आरक्षण नसलेल्या प्रवाशांना आरक्षित डब्यात रेल्वेने मज्जाव केला आहे. आरक्षण नसलेल्यांची अनारक्षित डब्यात गर्दी होते. महिलांसाठी राखीव डबा असला तरी तो लहान असल्याने त्या डब्यात पाय ठेवायला जागा नसते. पॅसेंजर असो, एक्स्प्रेस अथवा अतिजलद गाडय़ा, त्यात फारतर दोन डबे अनारक्षित असतात. त्यामुळे किमान अनारक्षित पाच डबे प्रत्येक गाडीत असायला हवेत.