सत्य लपवून त्याचा मक्ता आपल्याकडे ठेवणाऱ्या समाजातील विशिष्ट घटकांनी धर्म, जात, देव, श्रद्धेच्या नावावर शोषणव्यवस्था उभी केली. त्याला छेद देण्याचे काम चार्वाक, गौतम बुद्ध, संत तुकाराम अशा अनेक महामानवांनी विज्ञानवादी दृष्टिकोनातून केले. जादूटोणाविरोधी विधेयक हे त्याचेच पाऊल आहे. त्यामुळे सामाजिक उन्नयनासाठी हे विधेयक अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. स्मिता शहापूरकर यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित जादूटोणाविरोधी वटहुकूम मंजुरी व अंमलबजावणी निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अंनिस शहर शाखाध्यक्ष एम. डी. देशमुख होते. जिल्हाध्यक्ष शैलजा भस्मे, कार्याध्यक्ष प्रा. किरण सगर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बशारत अहमद यांची उपस्थिती होती. समाजातील अविवेकी सत्ता, संस्काराच्या नावाने केली जात असलेली फसगत, बुवा-बाबांच्या रूपाने माजलेले स्तोम आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. एकटय़ा आसाराम बापूंचे उदाहरण घेतले, तरी देव-धर्माच्या नावाखाली घाणेरडे व असभ्य प्रकार सुरू असल्याचे डॉ. शहापूरकर यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी, शंभर विचारांपेक्षा एक कृती महत्त्वाची असते आणि सरकारला आता विचारांऐवजी कृतीचीच भाषा समजते, असे सांगून यापुढील काळात विचाराच्या मशाली हाती घेऊन विज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश समाजाला देण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली असल्याचे सांगितले. डॉ. बशारत अहमद यांनी इस्लाम अंधश्रद्धेला विरोध करणारा क्रांतिकारी धर्म असल्याचे सांगितले. इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सगर यांनी अंनिसची कामे, उद्देश आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष देशमुख यांनी यापुढील काळात अनेक समविचारी संस्था, संघटनांना हा विवेकाचा जागर अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. शाखा कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे यांनी प्रास्ताविक, तर शीतल वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी तांबे यांनी आभार मानले.