राज्याचा व देशाचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक व गुणात्मक बदल होण्याची गरज आहे, असे मत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
गुरुवारी, शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभात जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्करांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल होते. जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
ग्रामविकास पाटील म्हणाले की, सध्याच्या खासगी व महागडय़ा शैक्षणिक स्पध्रेत जिल्हा परिषद शाळांनी पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका राहील. आगामी काळात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ‘ऑनलाईन’ पध्दतीने करण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये तासिका तत्त्वावर बदली शिक्षकांची नेमणूक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री सोपल यांनी शिक्षकांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या असून जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी केलेली निवड अतिशय पारदर्शक असल्याचे उद्गार काढले. शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी आदींची भाषणे झाली. जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल भरावे लागते, ते शासनाने माफ करावे, अशी मागणी डॉ. माळी यांनी केली.
या वेळी ‘आदर्श बना-आदर्श घडवा’ या संदेशाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याच्या सर्व ११ तालुक्यातील विविध शाळांमधील ११ आदर्श शिक्षकांना तसेच तालुकानिहाय शिष्यवृत्तीप्राप्त ११ आदर्श शिक्षकांसह आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जयश्री सुतार यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. शीतल जालीिमचे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी आभार मानले. या समारंभास आमदार सिद्रामप्पा पाटील, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार सुधारक परिचारक, माजी जि. प. अध्यक्ष बळीराम साठे, जि. प. अध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती शिवाजी कांबळे, जािलदर लांडे, जयमाला गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी विद्या िशदे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा