तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनर्थ घडल्याच्या पार्श्र्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरातही भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन न केल्यास तुळजापूरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती पंढरपुरातही होऊ शकते, असा इशारा सुरक्षाविषयक यंत्रणांच्या सूत्रांनी दिला आहे.
जगातील अतिप्राचीन शहरांपकी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे एक कोटीपर्यंत भाविक व वारकरी पंढरपुरात येतात. आषाढी, काíतकी, माघी व चत्री या चार यात्रांच्या काळात लाखोंची गर्दी पंढरीत होते. तसेच नवरात्र, दिवाळी या सणांच्या काळातही भाविकांची मोठी गर्दी राहते. वाढत्या गर्दीच्या प्रमाणात या ठिकाणी केले जाणारे नियोजन तोकडे असल्याचे दिसून येते. आषाढी, काíतकी यात्रेच्या वेळी चेंगराचेंगरीचे घडणारे प्रकार नवीन नाहीत. विठ्ठल दर्शन सुलभ होण्यासाठी मंदिर समितीने १९८४ साली ३० हजार भाविकांच्या क्षमतेचे  ज्ञानेश्वर दर्शन मंडप उभारले. सद्य:स्थितीत या दर्शन मंडपालाही कालानुरूप मर्यादा आल्या आहेत.
अलीकडे दहशतवादी व अन्य घातपाती कारवाया विचारात घेता विठ्ठल मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिराबाहेर नामदेव पायरीजवळ धातुशोधक ‘स्कॅनर यंत्रणा’ बसविण्यात आली आहे. स्कॅनर यंत्रणेद्वारे भाविकांचे साहित्य तपासणीचा वेग आणि भाविकांच्या गर्दीचा वेग यांच्यात ताळमेळ बसत नाही. विशेषत: यात्रा किंवा अन्यवेळी गर्दीच्या प्रसंगी स्कॅनर यंत्रणेची मंद गती विचारात घेता भाविकांच्या गर्दीचा लोंढा वाढण्याची आणि तो मंदिराबाहेर आदळून व परिणामी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्कॅनर यंत्रणेचा विस्तार करण्याची गरज आहे. तसेच ही स्कॅनर यंत्रणा मंदिरालगत संत नामदेव पायरीजवळ न बसविता ती आणखी दूर अंतरावर किंवा संत ज्ञानेश्वर मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ बसविणे उचित ठरेल, असे सुरक्षा व्यवस्थेतील तज्ज्ञांचे मत आहे.
मंदिर परिसरात सुरक्षेसाठी ३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र यापकी बऱ्याच कॅमेऱ्यांची दिशा योग्यप्रकारे ठेवली नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जास्तीत जास्त परिसर कॅमेऱ्यात बंदिस्त होणे अपेक्षित असताना त्यादृष्टीने कॅमेऱ्यांची रचना करणे आवश्यक आहे. अन्यथा गर्दीच्या काळात दुदैवाने एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडला तर त्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कितपत होईल, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मंदिर परिसरातील रस्ते चिंचोळे असून या रस्त्यांचे रुंदीकरण करून मंदिराबाहेर मोकळी जागा उपलब्ध होणे ही निकडीची बाब ठरली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आषाढी यात्रेत विशेषत्वाने भाविक व वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरीत दाखल होतात. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या तब्बल ७ किलोमीटर दूर अंतरापर्यंत रांगा लागतात. या दर्शन रांगांमध्ये बेशिस्त, अपुरी सुरक्षा यंत्रणा आदी कारणांमुळे चेंगराचेंगरीचे छोटेमोठे प्रकार घडतात. यात दरवर्षी १५ ते २० भाविक जखमी होतात. याबाबतही दर्शन रांगेत आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे.

Story img Loader