आदिवासी भागाप्रमाणेच आता नक्षलवाद शहरी भागातही फोफावू लागला आहे. याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे व त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे मत धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विद्यापीठ अनुदान आयोगाने पुरस्कृत केलेल्या ‘नक्षलवाद: ऐतिहासिक दृष्टिकोन, सामाजिक व आर्थिक परिणाम व वर्तमान राजकीय परिस्थिती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताचे नागपूर ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्थिक विषमता हे हिंसक चळवळींचे मूळ असते. नागरी समाजाला नक्षलवादाविषयी फारच थोडी माहिती आहे. शहरी भागातही आता नक्षलवाद पोहोचला असल्याने या विषयावर चर्चा घडून येणे आवश्यक असल्याचे डॉ. तायवाडे म्हणाले.
याप्रसंगी बोलताना गावंडे यांनी नक्षलवादाच्या वर्तमान स्थितीवर प्रकाशझोत टाकला. नक्षल चळवळीला आदिवासींचे भले व्हावे किंवा त्या प्रदेशाचा विकास व्हावा, याबाबत आस्था राहिलेली नसून आता आदिवासी समाजही या चळवळीपासून दूर जाऊ लागला आहे. ही चळवळच आता आता आदिवासींच्या विकासात अडसर बनली असून तिथेही भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे. या चळवळीला दहशतीच्या बळावर या देशातील संपूण राज्यव्यवस्था ताब्यात घ्यावयाची आहे. शहरी भागात आपला विस्तार करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले असून दलित समाजाला लक्ष्य केले आहे. याबाबत शहरी भागात चर्चा व जाणीवजागृती होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
चर्चासत्रात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्राचे उद्घाटन भारताचे फिजी येथील माजी राजदूत आय.ई.चौहान यांनी केले. पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे यांनी बीजभाषण केले. विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा