आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगणक तज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाबाबत चर्चा व्हावी या उद्देशाने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र आणि इतर संस्थांच्या वतीने ‘लोकसंवाद’ उपक्रमातंर्गत ‘कॉम्प्युटर युगातील मराठी भाषा’ या विषयावर समूह चर्चेचे आयोजन सिलिकॉन व्हॅली येथे करण्यात आले होते. या वेळी खांडबहाले यांनी आपले मत व्यक्त केले. संगणकतज्ज्ञ अनुराग केंगे यांनी, इंटरनेटवर उपलब्ध असणारी वृत्तपत्रे, ब्लॉग यांतून विचारस्वातंत्र्याला लोकजागृतीचे परिमाण लाभले आहे आणि मराठी व संगणक साक्षरतेच्या ते भल्याचे आहे, असे नमूद केले. बोलीभाषेतील शब्दांचा जास्तीत जास्त वापर भाषेच्या विकासासाठी पूरक असतो असेही ते म्हणाले. पत्रकार प्रियंका डहाळे यांनी व्यवहारात इंग्रजी व मराठीची सरमिसळ करण्यापेक्षा दोन्ही भाषांचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करून नव्या लेखकांचे लेखन वाचावे, असा सल्ला दिला. साहित्यिक नंदन रहाणे यांनी मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड काढून टाकणे गरजेचे असून अस्मिता आणि अस्तित्व भाषेशी निगडित गोष्टी असल्याचे सांगितले. संगणकतज्ज्ञ प्रमोद गायकवाड यांनी मराठीची जपणूक करण्यासाठी ई-बुक्ससारखी वाचन संस्कृती जगण्याचा परिघ वाढवणारी आहेत. समाजात संगणकाविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी मराठी प्रतिशब्दांचा वापर करावा, असे सांगितले. प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ऊर्जा पाटील यांनी केले.
बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज -सुनील खांडबहाले
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण
आणखी वाचा
First published on: 25-10-2013 at 08:31 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of documentation of dialects sunil khandbahale