६० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक प्रबोधन व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून भारत विद्यालयाची जडणघडण दिवंगत दिवाकरभय्या आगाशे यांनी केली आहे, त्याच कृतीशील उपक्रमाची आज समाजाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबा नंदनपवार यांनी भारत विद्यालयाच्या हीरक महोत्सव वर्षांचा शुभारंभ करताना केले.
 भारत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिवाकरभय्या आगाशे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी आई-बाबांची शाळा या अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून आज हीरक महोत्सवी वर्षांचा शुभारंभ करण्यात आला. दिवाकरभय्या आगाशे व शशिकला आगाशे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते ६० दिवे प्रज्वलित करून आणि ६० रांगोळया काढून हीरक महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे यांच्या हस्ते डॉ. नंदनपवार यांचा सत्कार करण्यात आला.
आज समाजाची संवेदना गोठत असताना संवेदनशील बालक तयार करावयाचे असतील तर प्रथम आई-वडील व पालकांमधील  संवेदनशीलता जागृत राहणे अत्यावश्यक आहे. घर संस्कार देणारी शाळा आणि शाळा आपुलकी जपणारे घर असावे अशी अपेक्षा व्यक्त करून मुलांमधील सृजनशक्ती वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. नंदनपवार म्हणाले. मुख्याध्यापक विलास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक शालीग्राम उन्हाळे यांनी करून दिला. आभार आचल उपार हिने मानले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबत अकोला येथील वक्ते सतीश फडके यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात बुलढाणा शहरातील विविध शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांसाठी शिवशक्ती जागरण या विषयावर सुधा कोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणतज्ज्ञ डॉ. नंदनपवार यांचे विशेष व्याख्यान झाले.