नवी मुंबई व पनवेलमधील तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे भाडेआकारणीसाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या दरबारामध्ये आपला माथा टेकला आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणी करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांनी वाहतूक व परिवहन विभागाने दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन या विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केले आहे. मीटरप्रमाणे कायदेशीर भाडेआकारणीसाठी प्रवाशांनी एक पाऊल पुढे टाकणे यामुळे गरजेचे असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
पनवेलमधील पाच हजार तीन आसनी रिक्षांना कायदेशीर मार्गाने भाडेआकारणीसाठी विविध प्रशासने एकवटली आहेत. मात्र यामध्ये लोकप्रतिनिधींचा कुठेही सहभाग दिसत नाही. एरवी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खांदा पुढे करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर गेले कुठे, असा प्रश्न प्रवासी व प्रशासनातील अधिकाऱ्यांना पडला आहे. लोकप्रतिनिधींना मानाच्या ताटाचे आमंत्रण न दिल्यामुळे याला काही अंशी प्रशासन जबाबदार आहे असे बोलले जाते. मात्र परिवहन आयुक्त महेश झगडे व नवी मुंबईचे पोलीस के. एल. प्रसाद यांनी सामान्य प्रवाशांसाठी आपले कर्तव्य पणाला लावले आहे. उच्चपदस्थांच्या या पवित्र्यामुळे त्यांचे सहाकारी अधिकारी प्रादेशिक अधिकारी अरुण येवला व पोलीस उपायुक्त अरविंद साळवी यांनीही आपल्या ताफ्यासह कंबर कसली आहे. नवी मुंबई व पनवेलकर प्रवाशांच्या समाधानातून आपल्या बदलीनंतरही आपली कारकीर्द आठवण्यासाठी कर्तव्याचा हा खटाटोप सुरू आहे. या सर्व मोहिमेमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
त्यांच्याही अनेक समस्या ते नेहमी मांडतात. सहा आसनी रिक्षांची बेकायदा वाहतूक रोखा, शहरी भागातील ही वाहतूक पूर्णपणे बंद करा, ठरावीक पल्ल्यांवर शेअर वाहतूक असू द्या, रस्त्यांमधील खड्डे दुरुस्त करा, स्क्रॅप रिक्षा बंद करा, अशा या मागण्यांचे स्वरूप आहे. पनवेलच्या प्रवाशांना तीनआसनी रिक्षांचा प्रवास मीटरप्रमाणे सुरू व्हावा हा वाहतुकीचा नियम असल्याने प्रवाशांचा हा हक्क मिळविण्यसाठी जगजागृती ग्राहक मंचासोबत प्रवाशांनी जागरूक होण्याची वेळ असल्याचे परिवहन व वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.  
पोलीस व परिवहन विभागातर्फे प्रवाशांना आवाहन
रिक्षा मीटरप्रमाणे न चालवणे, उद्धट वर्तन, जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या शहर शाखेने १०० किंवा ०२२२७४५१५९१ किंवा मोबाइल क्रमांक ७७३८३९३८३९ किंवा जवळचे वाहतूक चौकी, लेखी तक्रार पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालय, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा, कोकण भवन, दुसरा मजला, सीबीडी बेलापूर येथे करावी.
तक्रार येथे करा
०२२२७४२४४४४, ०२२२७४२५५५५ (कार्यालयीन वेळेत) किंवा मोबाइल नंबरवर एसएमएस करून तक्रार करण्यासाठी ९००४६७०१४६  ईमेल आयडीवर तक्रार पाठवावी. एसएमएस आणि ईमेलवर तक्रार करताना नाव, पत्ता, तारीख, वेळ, रिक्षा क्रमांक, तक्रारीचे स्वरूप असे लिहावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा