राज्यातील रेल्वेचे प्रश्न एकत्रितपणे मांडण्यास महाराष्ट्रव्यापी रेल्वे संघर्ष समिती नाही. ती गठीत करण्याची गरज आहे. तसे न झाल्याने प्रत्येकजण वेगवेगळ्या लढाया करतो आणि पराभूत होतो, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांनी व्यक्त केली. सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग औरंगाबादला जोडणे योग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तसे केल्याने पैठण, वेरुळ ही ऐतिहासिक स्थळेही दक्षिणेला जोडणे सोयीचे होईल.
राज्यात अर्थसंकल्पापूर्वी प्रत्येकजण वेगवेगळी मागणी करतो. वास्तविक, मागण्यांचा साकल्याने विचार करून एकच मागणी केली तर त्याचा परिणाम होऊ शकतो. नाशिकमधील एक गट नाशिक-पुणे अशी मागणी करतो व दुसरा गट नाशिक-डहाणू अशा मार्गाची मागणी करतो. नक्की काय मागायचे आहे, हे ठरत नाही. परळी-बीड-नगर-माळशेज अशी मागणी केली असती तर अधिक फायदा झाला असता. मात्र, सर्वजण वेगवेगळ्या लढाया करतात, पराभूत होतात. त्यामुळे रेल्वे संदर्भातील मागण्या करताना राज्यपातळीवर संघटना उभी राहावी, असे ते म्हणाले.

उन्हाळी गाडय़ांची मागणी
मराठावाडा रेल्वे संघर्ष समितीने उन्हाळ्यात काही नवीन गाडय़ा सोडाव्यात, अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. सोईन यांच्याकडे केली आहे. नांदेड-औरंगाबाद-जम्मूतावी अशी विशेष हॉलिडे रेल्वे सुरू करावी. तसेच नांदेड-औरंगाबाद-मनमाड-जळगाव-नंदूरबारमार्गे बिकानेपर्यंत रेल्वे सुरू करावी. औरंगाबाद-परभणी-परळी-रायचूर-बंगळूर अशी रेल्वे सुरू करावी. रेल्वेचे आरक्षण ३१ मे २०१३पर्यंत पूर्ण झाले असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना अडचण निर्माण झाली आहे. या गाडय़ांची डब्यांची संख्या वाढवावी, तसेच आरक्षण विभागात सीसीटीव्ही कॅमेरेही लावावेत, अशी मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी केली.