शिक्षण किंवा शिकणे ही एक कलाच आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आधी शिकण्याची कला आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्ञानप्रबोधिनीचे (पुणे) माजी प्राचार्य विवेक पोंक्षे यांनी येथे केले.
नगरकर्स क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘शिकण्याची कला व आनंदाने कसे जगावे’या विषयावरील व्याख्यानात पोंक्षे बोलत होते. पत्रकार सुभाष गुंदेचा, सुधीर मेहता, क्लासेसचे संचालक विनोद नगरकर, विलास नगरकर आदी या वेळी उपस्थित होते. दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
पोंक्षे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जगावे कसे हे आधी शिकले पाहिजे. वाढत्या वयानुसार व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणले पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीतूनच अनेक गोष्टी शिकता येतात. यापुढच्या काळात शिक्षणालाच अधिक महत्त्व आहे विद्यार्थ्यांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे. एखादी माहिती मिळाल्यानंतर ती समजली की नाही हे त्या माहितीच्या विश्लेषणावरून स्पष्ट होते. एखाद्याला माहिती समजली, मात्र जीवनात उपयोग करता न आल्यास या शिक्षणाचाच उपयोग होणार नाही. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे, वेळच्या वेळीच ते लिहून ठेवावेत. घरातील मोठय़ा व्यक्तींचे अनुकरण मुले करत असतात. या गोष्टींचे भान ठेवूनच पालकांनी वागले पाहिजे.
गुंदेचा व मेहता यांचीही या वेळी भाषणे झाली. विनोद नगरकर यांनी प्रास्ताविक केले. विलास नगरकर यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा