यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने याआधीच सव्‍‌र्हेक्षण झालेला नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सुरू करण्यासाठी राज्याने केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी खा. हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
   नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांदरम्यान व्यापार व उद्योग वाढीसाठी रेल्वेमार्ग सुरू होणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गासाठी याआधीच सव्‍‌र्हेक्षणही झाले आहे. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना निधीअभावी साधूग्रामचे काम अत्यंत संथपणे सुरू असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. साधुग्रामसह सिंहस्थाच्या इतर कामांना वेग यावा यासाठी केंद्र शासनाकडून भरीव निधीची तरतूद लवकरात लवकर होण्याबाबत प्रयत्न करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
दमणगंगा-पिंजाळ हा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प आहे. १९९७ च्या कराराप्रमाणे प्रत्येक राज्यातील पाणलोट क्षेत्राचे पाणी त्या त्या राज्याने वापरावे यासाठी त्या त्या राज्याचे पाणी त्याच्या खोऱ्यात टाकणे हे राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्दीष्ट असण्याची गरजही गोडसे यांनी व्यक्त केली. त्यामुळेच दमणगंगा-गोदावरी जोड प्रकल्पाचा समावेश दमणगंगा-पिंजाळ या राष्ट्रीय प्रकल्पात करावा, पाणी प्रश्नाकरिता केंद्राकडून पूर्वशक्यता अहवाल तयार करण्यासाठी शिफारस करण्याबाबतही त्यांनी नमूद केले. ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी याअगोदर विमानतळ इमारत दीर्घकाळाकरीता एक रुपये भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. तसेच राज्य शासनाने चार महिन्यांसाठी सुरक्षा व्यवस्थाही करून द्यावयाची असल्याने सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरात लवकर पाठवून तो मंजूर करून विमानसेवा सुरू करण्यात यावी, शिलापूर येथे सेंट्रल पॉवर रिसर्च सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यासाठी जागा हस्तांतरण व प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याकरिता शिफारस करावी, सिन्नर तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी दमणगंगा-गोदावरी जोड योजनेतून गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विनीयोग करावा, त्यासाठी वैतरणा-कडवा-देवनदी जोड योजनेचा पूर्वशक्यता अहवाल तयार करण्यासाठी केंद्राकडे मुद्दा मांडावा, आदी सूचनाही गोडसे यांनी केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत स्वतंत्र अन्वेषण विभाग स्थापन करण्याची सूचना गोडसे यांनी केली. सावतामाळी नगर, सिन्नर येथे कृषी महाविद्यालय व प्रक्रिया केंद्रास तत्वत: मंजुरी मिळाली असून त्यासाठी जागा हस्तांतरण प्रस्तावास मान्यता द्यावी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूर येथील स्मारक नूतनीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.