देशातील साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु असल्या तरी आयात-निर्यात धोरणमुक्तीच्या निर्णयातही बदलाची आवश्यकता आहे. आयात साखरेवर जादा कर आकारणी केली तरच साखरेचा दर एकसमान राहणार असून त्याचा फायदा देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
द वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट एॅन्ड केन ग्रोअर्स (जागतिक बीट आणि ऊस उत्पादक संघ) च्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही आजवरच्या साखर उद्योगातील कार्याचा गौरव असल्याचे सांगून श्री. आवाडे म्हणाले,‘‘ संघटनेची प्रत्येक ३ वर्षांतून एकदा जागतिक परिषद भरत असते. संघाच्या कार्यकारी मंडळाची एकत्रित बठक प्रत्येक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत भरत असते . या बठकीचे यजमानपद वेगवेगळ्या देशांकडून स्वीकारले जाते. पुढील वर्षी ही बठक ११ ते १३ जून २०१४ दरम्यान बेल्जियम या ठिकाणी भरणार आहे. तर पुढील विचार-विनिमय बठक २५ नोव्हेंबर २०१३ रोजी लंडन येथे होणार आहे. ही संस्था जगातील सुमारे ३० टक्के साखर उत्पादन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असून त्यापकी जवळजवळ ६० टक्के उत्पादनात कौटुंबिक शेतीचा वाटा आहे.’’
‘‘संघाचा उपाध्यक्ष या नात्याने वेगवेगळ्या देशातील ऊस व बीट उत्पादकांशी संबंध प्रस्थापित करुन आपल्या देशातील सहकारी साखर उद्योगाला त्याचा लाभ मिळवून देण्याची संधी या निवडीमुळे मिळाली आहे. या निवडीचा फायदा देशभरातील सर्वच साखर कारखान्यांना होण्यासाठी आणि राष्ट्रीय साखर उद्योगाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ’’ग्वाही, आवाडे यांनी दिली.पत्रकार परिषदेत माजी मंत्री प्रकाश आवाडे, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास गाताडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, राहुल आवाडे यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.