स्वामी विवेकानंदांनी जगाला मानव कल्याणाचा व्यापक विचार दिला. आज या विचाराची पुन्हा जोपासना होण्याची गरज असल्याचे मत निरुपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अ. भा. वि. प. विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प घळसासी यांनी ‘नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील होते. प्रभाकर अयाचित स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानास आबालवृद्धांसह सर्व स्तरातील नागरिकांची गर्दी होती. घळसासी यांनी प्रेरक संवाद साधत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर यशवंत जोशी, अ‍ॅड. संजय पांडे, संजय अयाचित यांची उपस्थिती होती.
घळसासी म्हणाले की, स्वामी विवेकानंदांना उणेपुरे अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. आयुष्याच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. केवळ ९ वर्षे समाजकार्य करताना त्यातील ५ वर्षे त्यांचे विदेशात वास्तव्य होते, तर शेवटचे सव्वावर्ष आजारपणात गेले. पावणेतीन वर्षांत त्यांनी जे काम उभे केले ते पुढील दीड हजार वर्षे उपयोगी पडणारे आहे. भावी पिढीने विवेकानंदांच्या कामाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. त्यांची सेवाव्रती, ज्ञानसाधना, अविरत मेहनत व राष्ट्रभक्ती या बाबी तरुणांनी अंगीकारल्या तर भारत बलशाली बनायला वेळ लागणार नाही.
ते पुढे म्हणाले, स्वत:ला दुर्बल समजून जी माणसे रडत, कुढत बसतात ती आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. त्यासाठी तरुणांनी स्वत:ला दुर्बल समजणे बंद केले पाहिजे. आयुष्यातील संकटे नाकारण्याऐवजी ती स्वीकारली पाहिजेत व संकटांना सामोरे जाण्याचे सामथ्र्य अंगी चेतविले पाहिजे. विवेकानंद संन्याशी असले, तरी संगीताचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संगीतावर पुस्तक लिहिले. धृपदगायकीचे ते अभ्यासक, उत्कृष्ट तबला, पखवाजवादक होते. बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर आयुष्याची वाटचाल करणारी माणसेच मोठी होतात, हे विवेकानंदांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर आढळून येते, असेही घळसासी म्हणाले.
घळसासी यांच्या हस्ते विवेकानंद पुतळ्याचे पूजन करण्यात आले. अ‍ॅड. संजय पांडे यांनी प्रास्ताविक केले. यशवंत पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. संतोष बीडकर यांनी वैयक्तिक गीत म्हटले.
 डॉ. तेजस्विनी अयाचित यांनी पसायदान म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीकु मार पाठक यांनी केले.