देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना अस्तित्वात येणे आवश्यक आहे. समाजात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळायला हवा, त्यासाठी सक्षम अधिकारी निर्माण होणे आवश्यक आहे आणि तुषार ठोंबरे हे तशा प्रकारचे सक्षम अधिकारी आहेत, अशा आशयाचे उद्गार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी.  पाटील यांनी काढले. इचलकरंजीतील नुकतीच बदली झालेले प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
एन. डी. पाटील यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार प्रदान करून ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. तर साडी, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून वैशाली पतंगे-ठोंबरे (आय.ए.एस.) यांचा सत्कार इचलकरंजी नगरपरिषद नगराध्यक्षा  सुप्रिया गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ठोंबरे म्हणाले की, अधिकारी रूजू झाला की त्याच्या जातीची चौकशी होते. पण सर्वानी हे लक्षात ठेवावे की अधिकाऱ्याला जात नसते. त्याला त्याचे अधिकार आणि घटनेच्या चौकटीतच काम करायचे असते. अधिकारी हा सर्वसामान्यांच्या कामाकरिता असतो. सांगायला अभिमान वाटतो, लोक विचारतात की तुम्हाला राजकीय दडपणाखाली काम करावे लागले का? तर मला इथे कोणत्याही राजकीय दडपणाखाली काम करावे लागले नाही आणि चुकीचे काम करा असे कोणीही सांगितले नाही. माणूस संघटनात्मक पातळीवर विविध प्रकारचे निषेध करण्यासाठी जमतो. संतप्त भावना व्यक्त करतो पण जेव्हा तो घरी परततो तेव्हा व्यक्तीगत पातळीवर तो काहीच करत नाही. इचलकरंजीत काम करताना खूप आनंद झाला. विविध संस्था, संघटना आणि व्यक्तीगत पातळीवर विविध विचार बैठका झाल्या. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घेऊन विविध कामांना सुरुवातही झालीय आता त्यात सातत्य हवं. आपण मला के व्हाही बोलवा मी येथे यायला उत्सुक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, के. के. दमाणी, प्रा. अमर कांबळे, ओम पाटणी, श्यामसुंदर मर्दा यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कोडूलकर यांनी स्वागत  तर राजेंद्र कोठारी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी  यांनी केले. मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष आनंद गजरे यांनी मानपत्र वाचन केले. तर इचलकरंजी नागरिक मंचचे अभिजित पटवा यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांनी केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा