विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ऊस उत्पादन हाच पर्याय शिल्लक आहे. केवळ ऊस लागवडीकडे लक्ष न देता एकरी उत्पन्न कसे वाढविता येईल याकडे गांभीर्याने व अभ्यासू वृत्तीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
पूर्ती उद्योग समूहांतर्गत सुरू असलेल्या पूर्ती पॉवर अ‍ॅण्ड शुगर लिमिटेड, महात्मा शुगर लिमिटेड आणि वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड या तीनही कारखान्यांच्या कृषी आढावा बैठकीत गडकरी बोलत होते. यावेळी एकरी ६० टनापेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कापूस, धान आणि सोयाबीन पिकांमधील अनियमितता, न परवडणारे दर, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक या संकटामुळे विदर्भातील शेतकरी आता उसाकडे नगदी पीक म्हणून बघू लागला आहे. एकीकडे विदर्भात साखर कारखानदारी दिवाळखोरीत निघालेली असताना आणि ऊस उत्पादकांचा या कारखान्यावरील विश्वास उडत असताना पूर्तीच्या माध्यमातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू करण्यात आलेले साखर कारखाने विदर्भाच्या विकासाची नांदी ठरू पाहात आहेत. पूर्तीवर विश्वास ठेवून शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. या शेतक ऱ्यांचा विश्वास कायम ठेवून त्यांना अधिक सक्षम करण्याची जबाबदारी कृषी अधिकारी आणि पूर्तीच्या संचालकांची आहे. उत्पादन वाढीसाठी व उसाची योग्य निगा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतत प्रशिक्षण घ्यावे व शेतक ऱ्यांनाही प्रशिक्षित करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
यावेळी गुमथळा गटातील महालगावच्या वासुदेव ठाकरे, भंडारा जिल्ह्य़ातील रेगेपारच्या फुलचंद बोरकर या ऊस उत्पादकांचा एकरी ६० टनापेक्षा अधिक उत्पन्न घेतल्याबद्दल गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी पूर्तीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला पूर्तीचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, महात्माचे उपाध्यक्ष विजयराव मुडे, सहव्यवस्थापकीय संचालक निखिल गडकरी, महात्माचे व्यवस्थापकीय संचालक नितीन मुधोळकर, आमदार नाना पटोले, आमदार डॉ. खुशाल बोपचे, डॉ. सुरेश बोपचे, अतुल देशकर, सुधीर पारवे, दादाराव केचे, महापौर अनिल सोले, माजी खासदार शिशुपाल पटले, सुरेश वाघमारे, रामदास तडस आदी उपस्थित होते.
वैनगंगाचे उपाध्यक्ष दादासाहेब टिचकुले यांनी आभार मानले.

Story img Loader