पत्रकारितेमध्ये वाढत चाललेल्या इंग्रजी-मराठी, शहरी-ग्रामीण स्वरूपाच्या प्रांतवादाला दूर करणे आवश्यक बनले आहे. पत्रकारितेचा खरा धर्म ओळखून त्यादृष्टीने पत्रकारांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक व ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी रविवारी इचलकरंजी येथे केले.
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पत्रकारदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख व्याख्याते म्हणून मोकाशी बोलत होते. या कार्यक्रमास ‘उंच माझा झोका’ फेम मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत राज्य शासनाकडून जो गोंधळ घातला जात आहे, त्याचा मोकाशी यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यापासून ते आजचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रत्येक मुख्यमंत्री पत्रकारांना संरक्षण देण्याची भाषा करतात. प्रत्यक्षात यासंदर्भातील कसलीही कृती ते करण्यास तयार नाहीत. उलट मंत्रिमंडळात या विषयावर विवाद असल्याचे कारण सांगून पत्रकारांना संरक्षण देण्याची नकारात्मक भूमिका राज्यकर्त्यांमध्ये रुजताना दिसत आहे. पत्रकारांच्या संरक्षणाची त्यांना खरेच चाड असले तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक आणून ते मंजूर करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पत्रकारदिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रांतील गुणवंतांना पुरस्कार देऊन मोकाशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये जयहिंद मंडळाचा खोखोपटू योगेश मोरे, वस्त्रोद्योजक मेहबूब मुजावर, आनुहिरा महिला गृह उद्योगाच्या अंजना आमणे यांचा समावेश होता. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा विशेष सत्कार मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर, नगरसेविका सुनीता मोरबाळे, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील यांची भाषणे झाली. पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबी यांनी स्वागत केले. भाऊसाहेब फास्के यांनी प्रास्ताविक केले, तर हुसेन कलावंत यांनी आभार मानले.
पत्रकारितेतील प्रांतवाद दूर करण्याची गरज- मोकाशी
पत्रकारितेमध्ये वाढत चाललेल्या इंग्रजी-मराठी, शहरी-ग्रामीण स्वरूपाच्या प्रांतवादाला दूर करणे आवश्यक बनले आहे. पत्रकारितेचा खरा धर्म ओळखून त्यादृष्टीने पत्रकारांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक व ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी रविवारी इचलकरंजी येथे केले.
First published on: 06-01-2013 at 08:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to remove regionalism in journalism