नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर पाटील अपयशी ठरले असून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करून वाढता नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे, असे मत विधानसभेतील मनसेचे गट नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.
गडचिरोलीमध्ये नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या दोन जवांनाची भेट घेण्यासाठी बाळा नांदगावकर नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. गडचिरोलीमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले असून दोन जखमी झाले. जखमी हेमंत आणि पंकज यांची त्यांनी भेट घेतली असून त्यातील हेमंतची प्रकृती नाजूक आहे तर पंकजच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गडचिरोलीसारख्या भागात नक्षलवादाशी सामना करताना जवानांना स्वरक्षणासाठी काहीच साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही. केवळ बंदूक त्यांच्याजवळ दिली जाते. बुलेटप्रुफ जॅकेट, गाडय़ा नाहीत. अशा परिस्थितीत जवान नक्षलवाद्यांशी लढत आहेत. जवानांच्या स्वरक्षणासाठी सरकारने काहीच केले नसून केवळ त्यांच्या जीवाशी खेळले जात आहे, असा आरोप नांदगावकर यांनी केला.
जवानांना सरकारतर्फे केवळ अडीच हजार रुपये कमांडो भत्ता दिला जातो. एकीकडे राज्यात मोठे घोटाळे होत असताना जवानांना केवळ अडीच हजार रुपये भत्ता देऊन त्यांच्या जीवांशी सरकार खेळत आहे. वाढत्या नक्षलवादासंदर्भात केवळ गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दोष देऊन चालणार नाही तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तेवढेच दोषी आहेत. निवडणुकीनंतर ते राहणार नाहीत. मात्र, त्यांनी आपण नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरलो म्हणून जनतेची माफी मागावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली. नक्षलवाद संपविण्यासाठी सरकारजवळ कुठलाही कृती आराखडा तयार नाही. नक्षलवाद या विषयावर कुठलेही राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. नक्षलगस्त भागासाठी प्राथमिक सुविधा, प्राथमिक अधिकार, शाळा, रस्ते , दिवाबत्ती, रोजगार आदी सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे. सरकारमध्ये इच्छशक्ती नसल्यामुळे नक्षलवादी हल्ले होत आहेत आणि त्यात जवान शहीद होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा