उपराजधानीत मिहानच्या रूपाने वेगवेगळे उद्योग सुरू होत असताना येणाऱ्या काळात अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. शिवाय, यासोबतच संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कोलकाता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सुरेश द्वादशीवार, कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे आणि विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रा. डॉ. थ्रिटी पटेल यांना न्या. जे.एन पटेल यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी न्या. पटेल म्हणाले, नागपूर विद्यापीठाला मोठा इतिहास असून विद्यापीठाने देश आणि जागतिक पातळीवर अनेक नामवंत हिरे दिले. त्यामुळे विद्यापीठाला दर्जा प्राप्त झाला आहे. जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांंना अनेक संधी आहेत. मात्र, आपल्याकडील विद्यार्थी संशोधनात कमी पडतात. भारतात आणि भारताबाहेरील अनेक विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. देशविदेशातील अनेक कंपन्या विद्यापीठाशी करार करून अभ्यासक्रम सुरू करतात. नागपूर विद्यापीठाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे आणि संशोधनासाठी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विशेष अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली गेली पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांंना रोजगाराच्या दृष्टीने शिक्षण घेता येईल. पी.एचडी.साठी विद्याथ्यार्ंना संशोधनाची गरज आहे. त्यासाठी देशविदेशातील विषयतज्ज्ञांना विद्यापीठाने आमंत्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. अनुपकुमार म्हणाले, नागपूर विद्यापीठाला मोठा इतिहास असून शिक्षणाचे ओजस्वी केंद्र म्हणून नागपूरची ओळख होती. शिस्तबद्ध विद्यापीठ म्हणून एकेकाळी लौकिक होता. मात्र, मधल्या काळात विद्यापीठाला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने देशपातळीवर टीका झाली. सर्वाच्या सहकार्याने विद्यापीठाचा विकास आणि गुणवत्ता टिकविणे शक्य असल्यामुळे त्यादृष्टीने येणाऱ्या काळात काम करण्याची गरज आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यापीठातील अनेक विभाग ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांंना विद्यापीठासंदर्भातील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येईल. विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमात गोंदियाच्या पुंजाबाई पटेल शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पटेल, रामटेक येथील किटस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर पटेल, विद्यापीठाच्या भूविज्ञानशास्त्र विभागातील प्रा.डॉ. दीपक मालपे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रतिभा महेंद्र सिरिया, पोरवाल महाविद्यालयातील प्रा. डॉ. श्रीबाला विश्वास देशपांडे, विद्यापीठाच्या अंकेक्षण विभागातील अधीक्षक सत्यदेव सीताराम रामटेके, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील शंतनू सतीश ठेंगडी, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अर्चना दास, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील गायत्री विजयकुमार टेकाडे आणि हिस्लॉप महाविद्यालयातील अवनिका अश्विनी गुप्ता या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय, विद्यापीठाच्या आस्थापन शाखेतील दफ्तरी पंकज श्रीराम बाबरे, नबीरा महाविद्यालयातील शिपाई जावेद अहमद इरशाद अंसारी यांना आदर्श शिक्षकेतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, विद्यापीठाच्या विविध विभागांतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वार्षिकांक स्पर्धामधील विजेत्यांनाही या कार्यक्रमात पुरस्कृत करण्यात आले. बजाज ऑटो लिमिटेडने नागपूर विद्यापीठाला कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत १० कोटी रुपये देऊ केले आहेत. कंपनीचे प्रतिनिधी म्हणून संजय भार्गव आणि विद्यापीठ यांच्यात त्या संबंधीचा ‘सामंजस्य करार’ यावेळी करण्यात आला. भार्गव यांनी ५० लाखाचा धनादेश कुलगुरू अनुपकुमार यांच्या स्वाधीन केला. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर आणि वर्षां देशपांडे यांनी केले. डॉ. अशोक गोमासे यांनी आभार मानले.
विद्यापीठातर्फे रोजगाराभिमुख विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज -न्या. पटेल
उपराजधानीत मिहानच्या रूपाने वेगवेगळे उद्योग सुरू होत असताना येणाऱ्या काळात अनेक रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे.
First published on: 05-08-2014 at 08:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to start the special courses