राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतीलाख लोकसंख्येमागे सुमारे साडेपंधरा हजार वाहनांची नोंद राज्यात आहे. त्याचवेळी एक किलोमीटर लांबीच्या मार्गावर सरासरी सुमारे ७२ वाहने राज्यात दिसतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व नागरी सुविधांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज राज्यात निर्माण झाली आहे. अपघातांची वाढती संख्या व अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी अॅम्बुलन्सच्या संख्येत सरकारी पातळीवर भर घालण्याची गरज आहे.
राज्यात पुणे जिल्हा नॉन ट्रान्सपोर्ट गटात, तर ठाणे ट्रान्सपोर्ट व पॅसेंजर वाहनांच्या संख्येत अग्रस्थानी आहे. राज्यात सर्वात कमी वाहनांची संख्या गडचिरोलीत आहे. राज्यातील एकूण वाहनांचा विचार केल्यास प्रती लाख लोकसंख्येमागे २००९-२०१० मध्ये १४ हजार २७२ वाहने होती. ही संख्या वाढून २०१०-२०११ मध्ये १५ हजार ५६० इतकी झाली. याचाच अर्थ, प्रतीलाख लोकसंख्येमागे या दोन वर्षांच्या तुलनेत १ हजार २८८ वाहनांची भर पडली. या दोन वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली असता पुणे, औरंगाबाद, अमरावती या विभागात वाहनांची संख्या वाढती आहे, तर, कोकण व नागपूर विभागात वाहनांची संख्या काही प्रमाणात घटती आहे.
दुचाकींचा विचार केल्यास राज्यात सर्वाधिक दुचाक्या पुण्यात (२२ लाख ९० हजार) त्या खालोखाल दुसरा क्रमांक ठाणे (११.२५ लाख) व तिसऱ्या स्थानावर नागपूरचा (११.११ लाख) आहे. गडचिरोलीत सर्वात कमी अर्थात, पंचेचाळीस हजार दुचाक्या आहेत. कारचा विचार केल्यास ठाण्यात सर्वाधिक, त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो. सर्वाधिक जीप पुण्यात, तर सर्वाधिक ओमनी बसेसची संख्या ठाण्यात आहे.
शेतीचा यांत्रिक विकास करण्यासाठी ट्रॅक्टर महत्वाचे माध्यम आहे. राज्यात सर्वाधिक अर्थात, साडेपन्नास हजार ट्रॅक्टर्सची संख्या एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ात आहे. संख्येच्या दृष्टीने मुंबईत सर्वात कमी १२९ ट्रॅक्टर्स आहेत. त्या खालोखाल सिंधुदूर्ग जिल्ह्य़ात ४७४ ट्रॅक्टर्स आहेत. सर्वाधिक ट्रॅक्टरच्या संख्येत नाशिकनंतर पुणे, अहमदनगर, जळगाव, सातारा या जिल्ह्य़ांचा क्रमांक लागतो. कोकण विभागात सर्वात कमी, तर नाशिक विभागात सर्वाधिक ट्रॅक्टर्स आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्य़ात शेतीसाठी उपयोगी असलेले ट्रॅक्टर्स मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांचे आवडते वाहन झाल्याचे चित्र आहे.
ट्रक व लॉरीचा, एल.एम.व्ही चार व तीन चाकी वाहने, टॅक्सी, प्रवासी ऑटोरिक्षा या वेगवेगळ्या प्रवर्गातील वाहनांची सर्वाधिक संख्या ठाणे जिल्ह्य़ात आहे. पुणे जिल्ह्य़ात बसेसची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत ऑटोरिक्षा नसल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. ट्रक व लॉरी, एल.एम.व्ही चार व तीन चाकी वाहने व बस या गटात सर्वाधिक वाहने ठाणे विभागात, तर सर्वात कमी वाहने अमरावती विभागात आहे. ठाणे विभागात सर्वाधिक, तर नागपूर विभागात सर्वात कमी टॅक्सी व ऑटोरिक्षांची संख्या आहे.
राज्यात एकूण वाहनांच्या संख्येत सर्वाधिक वाहने पुणे विभागात ३०.२६ टक्के आहेत, तर सर्वात कमी वाहने अमरावती विभागात केवळ ६.३६ टक्के आहे. राज्यात प्रती लाख व्यक्तींमागे वाहनांची संख्या वाढती आहे. त्या प्रमाणात राज्यात अॅम्बुलन्सची संख्या वाढली नसल्याचे चित्र आहे. राज्यात प्रती लाख लोकसंख्येमागे अॅम्बुलन्सची संख्या केवळ ८.५ इतकी आहे. राज्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता अॅम्बुलन्सची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अॅम्बुलन्स क्षेत्रात खाजगीकरण न करता त्यांची संख्या ट्रस्ट किंवा सरकारी क्षेत्रात वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.     (क्रमश)

Story img Loader