पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे. कुणाला मुबलक, तर कुणाला अपुरे पाणी मिळत आहे. वेळ आणि दाब कमी केला असला तरी पंपाच्या मदतीने पाणी भरणाऱ्या चाळकऱ्यांना कपातीचा फारसा फरक पडलेला नाही, तर अधिकृत आणि अनधिकृत नळजोडण्यांमुळे झोपडपट्टीवासीयांनाही पुरेसे पाणी मिळत आहे. केवळ तळमजल्यावर टाकी असलेल्या सोसायटय़ांना कपातीचा फटका बसला असून ते पालिकेकडे टँकरची मागणी करू लागले आहे. पाणीपुरवठय़ातील हा असमतोलपणा दूर करण्यासाठी आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावे, अशी मागणी मुंबईकरच करू लागले आहेत. त्यामुळे किती पाण्याची बचत होते हे उमजेल आणि कमी पाणीपुरवठा होणाऱ्यांचे हाल थांबतील. मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात लागू झाल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. चाळींमधील रहिवासी चिंतित झाले होते. परंतु पंपाच्या मदतीने पाणी भरणाऱ्या चाळकऱ्यांना सध्याच्या कपातीचा फारसा फरक पडलेला नाही. केवळ डोंगरावरील वस्त्यांमध्ये पाण्याची चणचण निर्माण झाली असून तेथील रहिवाशांना पायपीट करून पाण्यासाठी पायथ्याशी जावे लागत आहे. या कपातीचा फटका सोसायटय़ांना बसला आहे. नियमानुसार तळमजल्यावरील टाकीवर पंप बसवून पाणी भरता येत नाही. त्यामुळे नियोजित वेळेत येईल तेवढेच पाणी टाकीत जमा होते. वेळ आणि दाब कमी झाल्याने या टाकीत कमी पाणी पडत आहे असून सोसायटय़ांना पूर्वीपेक्षा कमी पाणी मिळू लागले आहे. परिणामी, पालिकेने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सोसायटय़ांमधील रहिवासी करू लागले आहेत.
अजून तरी चणचण नाही
पालिकेने मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली असली तरी त्याचा फारसा फरक पडलेला नाही. पूर्वी सकाळी ५ ते ६.३० या वेळेत पाणीपुरवठा होत होता. आता पाणीपुरवठा थोडा लवकर बंद केला जातो. परंतु आजही पूर्वीप्रमाणेच पुरेसे पाणी भरून होते.
अतुल दाभोळकर, गिरगाव
त्याऐवजी आठवडय़ातून एकदा बंद करावे
चुनाभट्टी भागात सायंकाळी ५ ते ७.३० वाजता पाणीपुरवठा होत होता. परंतु कपात सुरू झाल्यापासून ७ वाजताच पाणीपुरवठा बंद होतो. वेळेबरोबरच पाण्याचा दाबही कमी झाला आहे. पाणी भरूनच होत नाही. त्यामुळे मोठय़ा काटकसरीने पाणी वापरावे लागत आहे. अशी २० टक्के कपात करण्यापेक्षा प्रत्येक विभागातील पाणीपुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवल्यास नेहमीचा त्रास वाचेल. येत्या १७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. त्यावेळी २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांचे हाल होतील. त्यामुळे आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यावर पालिकेने विचार करावा.
स्मिता सुधाकर म्हात्रे, चुनाभट्टी
डोंगरावरील वस्तीत पाणी नाही
श्रीकृष्णनगरमधून मोठी तानसा जलवाहिनी जात असल्याने लगतच्या झोपडपट्टीला २४ तास पाणीपुरवठा होतो. पण २० टक्के कपात केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचा दाब कमी करण्यात आला आहे. परिणामी डोंगरावरील वस्तीमध्ये पाणीच पोहोचत नाही. महिलांना हंडे घेऊन डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वस्तीतील सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी यावे लागते. असे करण्याऐवजी आठवडय़ातून एक दिवस विभागाचा पाणीपुरवठा पूर्णच बंद ठेवावा.
श्वेता मसुरकर, साकीनाका सफेद पूल
आम्हाला ४० टक्के कपात
म्हात्रे रेसिडन्सीला दररोज १०,००० लिटर पाणीपुरवठा होत होता. पण कपात सुरू झाली आणि तो ६००० लिटरवर आला. २० टक्क्यानुसार २००० लिटर पाणी कमी व्हायला हवे होते. पण तब्बल ४००० लिटर पाणी कमी मिळत आहे. म्हणजे आम्हाला ४० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पाणीकपात लागू करण्यापेक्षा आठवडय़ातून एक दिवस पाणीच बंद ठेवावे. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्या मुंबईकरांमध्ये जनजागृती होईल आणि सर्वानाच पाण्याची किंमत कळेल.
प्रकाश पाटील, म्हात्रे रेसिडन्सी, दहिसर (प.)
एक दिवस पाणी बंदचा तोडगा उत्तम
महाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. त्यामुळे तेथे आठवडय़ातून दोन-तीन दिवस पाणी मिळते. मुंबईकरांना मुबलक पाणी मिळत आहे. सध्या कपात केल्यामुळे पाणीपुरवठय़ाची वेळ आणि दाब कमी झाला आहे. आठवडय़ातून एक दिवस पाणी बंदचा तोडगा उत्तम आहे. पण त्याची अंमलबजावणी होईल का?
राजेंद्र परमार, एन. एल. कॉम्प्लेक्स, दहिसर (पू.)
त्यापेक्षा एक दिवस पाणी बंद ठेवा’ मुंबईकरांची वाढती मागणी
पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे मुंबईकरांना असमतोल पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
First published on: 02-09-2015 at 03:33 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to take one water break