पहिल्या सत्रातील पावसाने सरासरीच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक तर, गतवर्षीच्या तुलनेत सव्वादोन पटीने जादा कोसळत नवे विक्रम नोंदविण्याचे जणू धोरणच अवलंबल्याचे चित्र आहे. दोन दिवस उसंत घेऊन पावसाने पुन्हा धोधो कोसळणे सुरू केल्याने आज दिवसभरात जनजीवन विस्कळीत राहिले. पावसाचा रात्रीचा जोर तर, दिवसाची ओढ अशी तऱ्हा पुन्हा सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे लोक वैतागले आहेत. तर, ओल्या दुष्काळाच्या भीतीने बळीराजा हवालदिल असल्याचे दिसून येत आहे.
कोयना धरणाक्षेत्रात जोमदार पावसाची तर धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी दमदार पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात पुन्हा झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. तर, खरिपावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. दरम्यान, गेल्या ५५ दिवसांत कोयना जलाशयात जवळपास ९७ टीएमसी पाण्याची आवक होताना, धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना नदीपात्रात सुमारे ३९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. धरणातून सोडलेले पाणी आणि सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत जोमाने वाढ होत असल्याने पाटणनजीकच्या संगमनगर धक्का पूलाबरोबरच मूळगाव, मेंढेघर तसेच कराड तालुक्यातील तांबवे पूल पुन्हा पाण्याखाली जाऊन सुमारे शंभर गावे व वाडय़ावस्त्या अंशत: व पूर्णत: संपर्कहीन होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या ७२ तासांत पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेबारा फुटांवरून टप्प्या, टप्प्याने ४ फुटांवर ठेवण्यात आले असून, त्यातून सध्या ३७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याचवेळी धरणात एकंदर ४६ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात गतीने वाढ होत आहे. परिणामी धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवरून आणखी काही फूट उचलणे अपरिहार्य झाले आहे. धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता धरण व्यवस्थापणाने व्यक्त केली आहे. आज दिवसभरात धरणाची जलपातळी १ फूट ४ इंचाने वाढून २,१४९ फूट २ इंच तर, पाणीसाठा १.१२ टीएमसीने वाढून ८७.१६ टीएमसी म्हणजेच सुमारे ८३ टक्के आहे. दिवसभरात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात ४० एकूण ३९४०, नवजा विभागात ३५ एकूण ४५९१ तर, महाबळेश्वर विभागात ६८ एकूण ४३५३ मि.मी. पावसाची नोंद आहे. दिवसभरात धरणाखालील कराड व पाटण तालुक्यातील संततधारेमुळे खरिपाच्या पेरण्या ठप्प राहताना जनजीवन विस्कळीत तर बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र आहे.
शासनाच्या माहिती कार्यालयाने सातारा जिल्ह्यतील तालुकानिहाय कळवलेला पाऊस, कंसात एकूण पर्जन्यमान – सातारा ३१.२ (७१५.५), जावळी ५७.९(११६८.४), कोरेगाव ९.४ (२६४.२), कराड ७.२ (३६०.६), पाटण ५६ (१२६०), वाई ९.८ (५२२.७), महाबळेश्वर सर्वाधिक ९६.७ (१९५४.९) खंडाळा २.७ (२९७.४) तसेच दुष्काळी फलटण शून्य (१५३.६), खटाव ३.७(२१२.३), माण ०.७ सर्वात अल्प ११३ मि.मी. पावसाची नोंद असून, जिल्ह्यात सरासरी ६२५ मि.मी. पाऊस झाल्याची आकडेवारी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2013 रोजी प्रकाशित
‘कोयना’तून मोठय़ा प्रमाणात विसर्ग अपरिहार्य
पहिल्या सत्रातील पावसाने सरासरीच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक तर, गतवर्षीच्या तुलनेत सव्वादोन पटीने जादा कोसळत नवे विक्रम नोंदविण्याचे जणू धोरणच अवलंबल्याचे चित्र आहे.
First published on: 01-08-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to water release from koyna dam