मुंबई, पुणे व विदर्भात पावसाचा जोर कायम असला, तरी मराठवाडय़ातल्या काही तालुक्यांमध्ये अजूनही चिंताजनक स्थिती आहे. टँकरची संख्या कमी केलेल्या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसांत पुन्हा टँकर सुरू करावे लागले आहेत. विभागात ७६ टँकर कमी झाले आहेत.
दुष्काळी बीड जिल्ह्य़ातील शिरूरकासार, केज, धारूर, आष्टी, अंबाजोगाईमध्ये पाऊस कमी आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम, कळंब व परंडा तालुक्यात मोठय़ा पावसाची नितांत गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून जोराचा वारा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अजूनही बहुतांश ठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली नाही.
मान्सूनपूर्व एक मोठा पाऊस आणि मान्सून सुरू झाल्यानंतर येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे विभागाचा पाऊस मोजताना येणारे टक्केवारीतील प्रमाण तुलनेने अधिक आहे. मृग नक्षत्रात मराठवाडय़ात तसा कमीच पाऊस येतो. या वर्षी वेळेवर पाऊस दाखल झाला. औरंगाबाद जिल्ह्य़ात सरासरी अपेक्षित पाऊस ७४.४७ टक्के होता. आजघडीला ही टक्केवारी १३४.४५ आहे. मात्र, सिल्लोड, सोयगाव व  कन्नड तालुक्यांतील पावसाच्या आकडेवारीमुळे ही टक्केवारी फुगली आहे. खान्देशाला लागून असणाऱ्या काही तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सिल्लोडमध्ये १४१.७५, सोयगाव १५६.६, तर कन्नडमध्ये ११४.११ मिमी पाऊस नोंदविला गेला. एकूण टक्केवारीत पावसाचे प्रमाण सरासरी गाठणारे आहे.
जालना जिल्ह्य़ात तुलनेने चांगला पाऊस झाला. मान्सूनपूर्व एक मोठा पाऊस झाल्यानंतर १ ते १७ जून या कालावधीत १००.३५ मिमी पावसाची नोंद झाली. घनसावंगी, मंठा व परतूर तालुक्यात तुलनेने पाऊस कमी आहे. परभणी जिल्ह्य़ातील मानवत तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे. येथे २९.२३ मिमी पाऊस नोंदवला गेला. सेलू, जिंतूर येथेही तुलनेने पाऊस कमी झाला. विदर्भाला लागून असणाऱ्या हिंगोली जिल्ह्य़ात मात्र तिकडे पडणाऱ्या पावसाचा परिणाम दिसून येतो. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, वसमत व औंढा नागनाथ या पाचही तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्य़ातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात फारसा पाऊस आला नाही. तेथे आतापर्यंत ३२.६६ मिमी पावसाची नोंद आहे.
तीव्र दुष्काळ असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्य़ात भूम, कळंब व परंडा तालुक्यात कमी पाऊस झाला. कळंब तालुक्यात केवळ ३४.४ मिमी पाऊस नोंदवला गेला. भूममध्ये ४५.५ व परंडय़ात ४७.६ मिमी पाऊस पडला. या तालुक्यात पाऊस कमी असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही तालुक्यात पडलेल्या मोठय़ा पावसामुळे जिल्ह्य़ाच्या सरासरीत वाढ दिसत असली तरी मोठय़ा पावसावरच अजूनही भिस्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा