आपल्या सभोवती अगणित चांगल्या गोष्टी घडत असतात. त्या लोकांपर्यंत पोहोचवून समाजातील नकारात्मकता कमी करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन अनिवासी गाववासी चळवळीचे प्रणेते प्रदीप लोखंडे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला व विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या वतीने ‘ग्रामीण ऊर्जा’ या विषयावरील परिसंवादात लोखंडे बोलत होते. सांगोल्याचे प्रफुल्ल कदम व श्रीरामपूरचे जयसिंग पवार यांनीही परिसंवादात आपली मते मांडली. लोखंडे म्हणाले, की १५ कोटी विद्यार्थी आता शिक्षण घेतात. दहा कोटी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन मिळते. जवळच प्राथमिक-माध्यमिक शाळा उपलब्ध आहेत. दर महिन्याला ५ लाख डीटीएच जोडण्या घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना काही प्रमाणात हमीभाव मिळत आहे. आगामी पंचवार्षिक योजनेत ५० लाख कोटी रुपये ग्रामीण विकासावर खर्च होणार आहेत. पंचायतराज व्यवस्थेमुळे साडेआठ लाख महिलांचा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग मिळाला आहे. ग्रामीण भागात संगणक व वाचनसंस्कृती जोपासली जात आहे. त्यामुळे कायम आजूबाजूच्या घटनांकडे नकारात्मक वृत्तीने पाहणे बंद केले पाहिजे.
सोलापूर जिल्हय़ातील सांगोला येथील प्रफुल्ल कदम यांनी वेडय़ा बाभळीपासून वीजनिर्मिती होऊ शकते. राज्यात व देशात अनेकांनी याचे प्रात्यक्षिक घेतले आहे. परभणीच्या विश्वशांती ज्ञानपीठात ५ वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. आजही देशात ४३ टक्के लोक विजेपासून वंचित आहेत. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत वेडय़ा बाभळींचा वापर केल्यामुळे ऊर्जेच्या निर्मितीत भर पडेल. नवा स्रोत उपलब्ध होईल. देशातील पडीक जमिनीचा वापर वेडय़ा बाभळींच्या उत्पादनासाठी केला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूरचे जयसिंग पवार यांनी सांगितले, की सलग समपातळी चर खोदून पावसाचे ८० टक्के पाणी मुरवता येते. हजारो झाडे लावून ती जगवली जाऊ शकतात. दरवर्षी पाऊस पडतो, माती पडत नाही. आहे ती माती मात्र पावसामुळे वाहून जाते. तिचे संगोपन करण्याची सवय लावली पाहिजे. माझे शेत ही संकल्पना लोकांमध्ये रुजली आहे. मात्र, त्या शेतात पडणारे दरवर्षीचे पावसाचे पाणी हे माझे आहे, ही भावना लोकांमध्ये अजून रुजली नाही. शेतातील पाणी जमिनीतच मुरवेन, ही भावना वाढीस लागली तरच माती व पाण्याचे संगोपन होईल.
आमदार अमित देशमुख यांनी जिल्हय़ातील प्रत्येक शाळेत संगणक पोहोचावा व गावात वाचनालय सुरू व्हावे, यासाठी प्रदीप लोखंडे यांच्या सहकार्याने अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले. उसाची उपलब्धता नसतानाच्या काळात वेडय़ा बाभळींचा वापर करून साखर कारखान्यात वीज निर्माण करण्याच्या प्रकल्पावर अभ्यास केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. विकास कारखान्यावर जयसिंग पवार यांच्या सहकार्याने सलग समपातळी चर खोदून पावसाचे पाणी मुरवले. हे अभियान जिल्हय़ातील साखर कारखान्यांच्या सहकार्याने जिल्हाभर पोहोचवण्यास प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण भागात कल्पकता वापरणारी मंडळी आहेत. त्यांची कल्पकता ऊर्जा विकासासाठी वापरली जावी या हेतूनेच परिसंवादाचे आयोजन केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन शिरीष पोफळे यांनी केले. प्रा. भिसे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा