गोंदिया जिल्ह्य़ात प्रौढ शिक्षणाचे साहित्य महिन्यांपासून बेवारस पडून
साक्षर भारत योजनेंतर्गत राबवण्याच येत असलेल्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाच्या वितरणासाठी आलेले हे साहित्य सध्या जिल्हा परिषदेच्या आवारात बेवारस स्थितीत एका कक्षात पडून असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या कक्षातील सोडा मात्र उघडय़ावर पडून असलेल्या या साहित्याबाबत जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. यावरून जिल्ह्यात प्रौढ शिक्षण कार्यक्रम केवळ कागदोपत्रीच तर चालत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमासाठी गोंदियात विशेष कार्यालय नसून शिक्षणाधिकारी भोंगाडे भंडारा येथील कार्यालयातून हा कार्यक्रम बघतात. या अंतर्गत जिल्ह्यासाठी लेखन, पाटय़ा, खडू व अन्य साहित्य पुणे येथून जानेवारी महिन्यात पाठविण्यात आले. मात्र, प्रौढांना वितरित करण्यासाठी आलेले हे साहित्य सध्या जिल्हा परिषद कार्यालयात पडून आहे. यातील पाटय़ा पायऱ्यांखाली बेवारस पडलेल्या आहेत. सुमारे ३१० पेटय़ा उघडय़ावर पडून असून एका पेटीत १०० पाटय़ा याप्रमाणे सुमारे ३१ हजार पाटय़ा येथे पडून आहेत. त्यातील कित्येक पेटी फुटलेली असल्याने त्यातून पाटय़ांची चोरी होत आहे, तर पावसाचा मारासुध्दा या पेटय़ांना सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आले. खडू व अन्य साहित्य शिक्षण विभागाच्या एका कक्षात असल्याचीही माहिती आहे. सुमारे लाखो रुपयांच्या घरात असलेले हे साहित्य जानेवारी महिन्यापासून असेच धूळखात आहे.
विशेष म्हणजे, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांना विचारणा केली असता त्यांना ही बाब ठावूकच नव्हती. त्यांनी चौकशी करून सांगतो असे म्हटले, तर उपाध्यक्ष मदन पटले यांना विचारणा केली असता त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याशी मोबाईलवर संपर्क साधून हे साहित्य भंडारा जिल्ह्याचे असल्याचे सांगून गोंदियाचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. यात खास बाब अशी की, प्रौढ शिक्षण कार्यक्रम बघणारे शिक्षणाधिकारी भोंगाडे यांचे गोंदियात कार्यालय नसून ते भंडाऱ्यात आहे. तेथून ते हा कारभार चालवित असल्याने त्या कर्मचाऱ्याने हे साहित्य भंडाराचे असल्याचे सांगून स्वतची सुटका करवून घेतली. यावरून जिल्हा परिषदेच्या इमारतीत पडून असलेल्या या साहित्याकडे पदाधिकारीच नव्हे, तर सदस्यांचीही साधी नजरही गेलेली नाही. भंडारा येथील भोंगाडे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, मार्च २०१३ पर्यंत प्रकल्पाची मुदत होती व त्याचदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाल्याने मुदत संपली व साहित्य तेथेच राहिले. आता मुदतवाढ करवून घेणार असून येत्या १५ दिवसात जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या लोक (प्रौढ) शिक्षण, केंद्रात हे साहित्य वितरित करणार असल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा