अकोल्यात यंदा पाणीटंचाई नाही, पण नजीकच्या बुलढाणा जिल्ह्य़ात पाणीटंचाई आणि दुष्काळही आहे. याच्या झळा अकोलेकरांना यापूर्वी बसल्या आहेत. त्या पुढील काळात बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे नागरिकांचे व महापालिकेचे दुर्लक्ष आहे, तसेच मोठय़ा प्रमाणात शहरात होत असलेली बांधकामे पाहता पाण्याचा अपव्यय यंदा जास्तच सुरू असल्याचे दिसते. महापालिकेचा पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करून शासनाने कारवाई केली आहे.
पाणीटंचाई आली की, विहिरी खोदण्याचे काम केले जाते, पण उन्हाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगची तयारी करण्यात शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गेल्या काही वर्षांत अकोल्यात तीव्र पाणीटंचाई असताना अनेक द्रविडी प्राणायम प्रशासनाने केले, पण यंदा टंचाई नसताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती शहरात लागू नसल्याचे चित्र आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकामे होत आहेत, पण येथे रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात बांधकाम व्यावसायिक लक्ष देताना दिसत नाही. नगररचना विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असून त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे महत्व कमी होताना दिसत आहे. विकास नियमावलीत नव्या बांधकामांना परवानगी देताना तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंग आवश्यक असताना या नियमावलीकडे सर्रास डोळे झाक होताना दिसत आहे.
महापालिकेने त्यांच्या ताब्यातील सार्वजनिक जागांवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. नव्या बांधकामांना सक्तीने रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यात मोलाची मदत होईल. ग्रामीण भागात शिवकालीन पाणीसाठवण योजना अस्तित्वात असून यात कुठलेही ठोस काम होताना दिसत नाही. रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रहाची भूमिका घेण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे, तसेच उठसूठ बांधकाम करणाऱ्यांवर व पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.