महामुंबई परिसरात रोज तब्बल ७५ ते ८० लाख नागरिक रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वेला कमीत कमी खर्चात सर्वाधिक उत्पन्न याच महामुंबई परिसरातून मिळते. कितीही गर्दी असली, कितीही गैरसोयी असल्या, गाडय़ा उशीरा असल्या, रद्द होत असल्या, उद्घोषणा होत नसल्या, रेल्वे पोलीस औषधालाही दिसत नसले.. अशा अनेक समस्या असल्या तरी सर्वसामान्य मुंबईकर इमानेइतबारे तिकीट/ पास काढून प्रवास करतो. विनातिकीट प्रवाशांची तुलनात्मक संख्या मुंबईत सगळ्यात कमी आहे.. मुंबईकरांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगता येतील. या सगळ्याचे फळ रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी मुंबईकरांच्या पदरात पुरेपूर टाकले. मुंबईची रेल्वेसेवा सुधारण्यासाठी आत्यंतिक तातडीने करण्याच्या अनंत गोष्टी असतानाही पवनकुमारांनी फक्त पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर अशा चारही मार्गावर मिळून उपनगरी गाडय़ांच्या अवघ्या ७२ फेऱ्या (कोच नव्हे) वाढविण्याचे प्रस्तावित केले. याव्यतिरिक्त मुंबईला काहीही न देण्याचा उद्धटपणा करताना रेल्वेमंत्र्यांनी आपल्या लेखी मुंबईकरांची किंमत काय हेच जणू दाखवून दिले. भरीस भर म्हणून मुंबईशी अविभाज्य नाळ असलेल्या कोकण रेल्वेच्या पदरीही रेल्वेमंत्र्यांनी ‘मोठ्ठा भोपळा’ टाकला आहे.गेल्या दोन महिन्यांत बन्सल यांनी केलेल्या रेल्वे दरवाढीचा सर्वाधिक फटका मुंबईकरांनाच बसला आहे. प्रतिकिमी अवघी २ पैसे दरवाढ केली, असे सांगणाऱ्या रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांवर ५० -६० किमीसाठीही ५ ते १० रुपयांची दरवाढ लादली होती. त्या पाश्र्वभूमीवर उपनगरी तिकीट आणि पासमध्ये कोणतीही वाढ केलेली नसल्याची शेखी बन्सल यांनी लोकसभेत मिरवली. परंतु त्याच ओघात आता वर्षभरात दोन वेळा रेल्वे भाडे वाढविण्याची तरतूद करून घेत उपनगरी प्रवास वर्षभरात कधीही वाढू शकतो अशी धमकीच जणू दिली आहे.विरार-डहाणू, पनवेल-कर्जत या मार्गावर उपनगरी सेवा सुरू करणे, ठाणे ते कर्जत व कसारा दरम्यान अधिक फेऱ्या सुरू करणे, अधिक रेक्स उपलब्ध करून देणे आदी भांडवली खर्चाची गरज असलेल्या प्रकल्पांसह अगदी फलाटांची उंची वाढविणे, प्रत्येक स्थानकातील पादचारी पुलांवर इंडिकेटर बसविणे, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे, पुरेशा तिकीट खिडक्या सुरू करणे यासारख्या सोयीसुविधांसाठीही रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही.  दुसरीकडे, देशभरात सर्वत्र नवीन गाडय़ांची घोषणा करणाऱ्या रेल्वेमंत्र्यांनी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी एकाही नवीन गाडीची घोषणा केलेली नाही. उन्हाळ्याची सुट्टी, गौरी-गणपती, होळी, दिवाळी, डिसेंबर महिना (म्हणजेच जवळपास संपूर्ण वर्षभर) या काळात कोकणातील गाडय़ांची प्रतीक्षा यादी दररोज ५०० च्या वर जात असतानाही रेल्वेमंत्र्यांना या मार्गावर एखादी गाडी सुरू करण्याची गरज वाटलेली नाही. एकुणात रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांना ‘ठेंगा’ दाखविला आहे.

Story img Loader