देशभरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत असताना नांदेडच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या तीन महिला अधिकाऱ्यांना एकाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे सौजन्य दाखवण्यात आले नाही. महिलादिनीच झालेली ही उपेक्षा जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनलेली होती.
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून जयश्री गोरे कार्यरत आहेत. निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून अर्चना देशपांडे तर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून अंजली देव कार्यरत आहेत. एरव्ही महिलांच्या कार्यक्रमासाठी त्यांना आवर्जून बोलावण्यात येते. मार्गदर्शन करण्यासाठीही शिक्षण विभागाला यांचीच गरज पडते. पण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची उपेक्षा समोर आली आहे.
 जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच अन्य खासगी संस्थांच्या वतीने आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. बहुतांश कार्यालयात शुकशुकाट होता.
पण उपशिक्षणाधिकारी जयश्री गोरे दुपारनंतर आपल्या कार्यालयात नियमित कामात व्यस्त होत्या. दहावी, बारावी परीक्षेच्या भरारी पथकाचे प्रमुख म्हणून दोन वाजेपर्यंत कर्तव्य पार पाडणाऱ्या जयश्री गोरे दुपारनंतर कार्यालयात पाहून अनेकांना धक्काच बसला. शिक्षण विभागतल्या या तीन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांपैकी कोणालाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते.