वरळी येथील नेहरू सेंटरचा १८ वा राष्ट्रीय नाटय़महोत्सव १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ नेहरू सेंटरचे संचालक एल. ए. काझी यांच्या संकल्पनेवर आधारित, प्रदीप ओक लिखित व प्रमोद पवार दिग्दर्शित ‘स्वर्गीय घोटाळा’ या नवीन मराठी संगीत नाटकाने होणार आहे. सदानंद डबीर यांची यात नाटय़पदे असून रघुनंदन पणशीकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. या नाटकात परकायाप्रवेशाच्या कथानकातून आज समाजात वाढत चाललेली असंवेदनशीलता, वाढती लालसा, आपल्या कर्तव्यांबद्दल लोकांना नसलेली जाणीव, प्रदूषित मानवी मने यावर भाष्य केले आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर- पुणे निर्मित, श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे लिखित आणि श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘दू अॅण्ड मी’ हे मराठी नाटकही महोत्सवात सादर होणार आहे. आज दळणवळम आणि संपर्कक्रांतीमुळे जगभर बहुसांस्कृतिकता रुजत आहे. देशोदेशीच्या भौगोलिक सीमा पुसट होऊन माणसे एकमेकांच्या जवळ येत आहेत. हे घडत असताना परस्परसंबंधांत येणारे ताणतणाव या नाटकात हलक्याफुलक्या पद्धतीने मांडले गेले आहेत.
महोत्सवात स्त्री-शक्तीचा प्रत्यय देणारे ‘औरत की जंग’ हे असिफ अली लिखित आणि ऊर्मिलकुमार थापलियाल दिग्दर्शित नाटकही सादर होणार आहे.
कुणाला कपूर लिखित व रामगोपाल बजाज दिग्दर्शित ‘कामिया’ हे स्त्रीला तिच्या विकासासाठी अवकाश देण्यासंदर्भात भाष्य करणारे नाटक, तसेच मधुराय लिखित आणि कपिलदेव शुक्ला दिग्दर्शित ‘खेलान्दो’ हे ‘स्लूथ’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित गुजराती नाटक होणार आहे. त्याचप्रमाणे ‘इक सी मन्टो’ हे सआदत हुसेन मंटो यांच्या जीवनावरील पंजाबी नाटक, कवी संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितांवर आधारित अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘लेझीम खेळणारी पोरं’ हे मराठी नाटक, कन्नड दिग्दर्शक बसवलिंगय्या यांचे ‘मायालोका’, जावेद सिद्दिकी यांच्या गाजलेल्या ‘ताजमहल का टेंडर’ नाटकाचा पुढचा भाग असलेलं ‘ताजमहल का उद्घाटन’, नादिरा बब्बर यांचे ‘यह है मुंबई मेरी जान’ ही नाटकेही महोत्सवात सादर होतील.
महोत्सवाची सांगता अर्जुनदेव चारण यांच्या ‘सत्याग्रह’ या राजस्थानी नाटकाने होईल. या महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका १२ सप्टेंबर रोजी नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये उपलब्ध होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा