ज्या हॉटेलमध्ये होतो ती इमारत डगमगल्यासारखे वाटल्याने काही क्षण काय सुरू  आहे ते कळलेच नाही. हॉटेलच्या बाहेर पडा, असे बाहेर लोक मोठमोठय़ाने ओरडत होते. बाहेर येऊन पाहतो तो काय.. काही अंतरावर इमारती कोसळत होत्या, जखमींचा आक्रोश, उखडलेले रस्ते, लोकांची धावधाव सुरू होती. प्रत्येकजण आपापला जीव वाचविण्यासाठी सैरावरा पळत होते. हॉटेलबाहेरच्या लॉनवर उभे राहून शहरातील सर्व थरारक चित्र अनुभवत होतो. यापूर्वी लातूरचाही भूकंप अनुभवलेला होता. मात्र, नेपाळमधील हा भूकंप मात्र आयुष्यभर लक्षात राहील,
काठमांडूला आयोजित करण्यात आलेल्या बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेला गेलेले नागपुरातील धंतोलीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. ऋषी लोडिया सोमवारी सकाळी नागपुरात परतल्यानंतर ते अंगावर शहारे येणारे अनुभवत सांगत होते. नागपूरहून २४ एप्रिलला निघाल्यावर २५ आणि २६ एप्रिल, अशी दोन दिवस न्युट्रिशनसंबंधित देशभरातील बालरोगतज्ज्ञांची परिषद काठमांडूतील ‘क्रगॉकम प्लाझा’ या हॉटेलमध्ये होती. विदर्भातून सहा डॉक्टर्स होते. २५ एप्रिलला परिषदेला सुरुवात होताच दुपारी ११.३० वाजता दुसरे सत्र सुरू होते. ज्या सभागृहात बसलो होतो तेथे आमच्या खुच्र्या हलण्याचा आणि इमारती डगमगल्याचा भास झाला. मात्र, काही सेंकदातच हॉटेलमध्येही ओरडण्याचा आवाज आला. कोणी तरी सभागृहात आले आणि लगेच हॉटेलच्या बाहेर पडा, असे सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येक जण सर्व सामान घेऊन हॉटेलबाहेर पडलो आणि पाहतो तो काय.. भूकंपामुळे आजूबाजूच्या जुन्या इमारती कोसळत होत्या, रस्ते उखडलेले होते, लोकांची पळापळ सुरू होती. काही अंतरावर आमच्या समोर एक चार मजली इमारत कोसळली. अनेक लोक जखमी अवस्थेत असताना त्यांना रुग्णनाहिकेतून घेऊन जात होते.
सर्वाना हॉटेलबाहेर काढण्यात आल्यामुळे आतमध्ये जाण्याचा प्रश्न नव्हता. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, आम्हाला काय होते हे कळत नव्हते. तेथील लोक आम्हाला आधार देत होते. हॉटेलची इमारत पडते की काय, असे वाटत असल्याने कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. आमच्या खोलीतून सामान बाहेर काढले आणि नंतर सुमारे दीड दिवस बाहेर लॉनवर काढले. त्या ठिकाणी रात्री झोपलो. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला आलेल्या भूकंपाने जास्तच घाबरलो. कारण, त्यावेळी आमच्या आजूबाजूच्याही इमारती कोसळत होत्या.
सतत अर्धा अर्धा तासाने भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे आमच्यातील प्रत्येकच जण जीव धोक्यात टाकून बसले होते. विमानतळकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. रस्ते उखडल्यामुळे कुठल्याही गाडय़ा त्या मार्गाने जाण्यास तयार नव्हत्या. ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्याच्यासमोर असलेली जुनी इमारत हलत असताना आम्ही अनुभवत होतो. आमचे मोबाईलही बंद झाले होते. नेपाळमधील सीमकार्ड घेतले. मात्र, ते काही कामच करीत नसल्याने घरच्यांशीही संपर्क होत नव्हता. २५ एप्रिलला दुपारपासून २६ एप्रिलला सायंकाळपर्यंत अनेक थरारक क्षण अनुभवले. रविवारी रात्री हॉटेल परिसरातून बाहेर पडल्यावर विमानतळावर रात्र काढली आणि एकदाचा आज सकाळी नागपुरात परतलो, असेही डॉ. लोडिया म्हणाले.  
‘पाऊस आणि थंडीत दिवसरात्र रस्त्यावरच होतो’
काठमांडूच्या नारायणी हॉटेलमध्ये आमचे काही पर्यटक बाहेर जाण्याच्या तयारी, तर काही तयारी करून हॉटेलखाली हिरवळीवर चर्चा करत होते. अचानक धक्का बसल्यासारखा झाला. असेल काही भास म्हणून दुर्लक्ष केले आणि धक्क्यांची तीव्रता वाढली. आजूबाजूने लोकांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर जाऊन पाहिले. हे साधे धक्के नव्हते, तर भूकंपाने नेपाळला आपल्या कवेत घेतले होते. एक पर्यटक व्यवस्थापक म्हणून पर्यटकांच्या सुरक्षिततेची माझी जबाबदारी होती. त्यामुळे आधी सर्व पर्यटकांना हॉटेलबाहेर काढले. तो अवघा दिवस आणि रात्र आम्ही रस्त्यावरच होतो. एकीकडे पाऊस आणि थंडी, अशा अवस्थेत आमचे सारे पर्यटक आहे त्या अवस्थेतच मैदानावर झोपले, पण त्यावेळी नेपाळ सरकारकडून कुणीही विचारपूस करायला आले नाही. अचानक बाजूच्या हॉटेलचे छत कोसळले आणि पाच लोक आमच्या डोळ्यादेखत त्याखाली दबले. त्यावेळी पोटात भीतीचा प्रचंड मोठा गोळा उठला, पण पर्यटकांची जबाबदारी अंगावर असल्याने ती दाखवता येत नव्हती. कसेबसे पर्यटकांना सावरले आणि रविवारी पहाटे आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घाबरलेल्या पर्यटकांनी विमानाने परतण्याची जिद्द केली. कारण, त्यांना लवकरात लवकर भारतात आपापल्या घरी पोहोचायचे होते. त्यांच्या समाधानासाठी विमानतळावर पोहोचलो. विमानतळावर त्यावेळी किमान २० ते २५ हजार पर्यटक होते. तेथेही काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे ट्रॅव्हल्सनेच माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
– कोहिनूर वासनिक, पर्यटक व्यवस्थापक, तथागत ट्रॅव्हल्स
डोळ्यादेखत मृत्यू बघितले.. सारेच थरारक!
थरारक अनुभव होता तो.. अजूनही डोळ्यासमोरून ती दृश्ये हलायला तयार नाहीत. धक्के भूकंपाचे होते, पण मनाला बसलेल्या त्या धक्क्यातून सावरायला किमान दोन-तीन तास लागले. मी चौथ्या माळ्यावर आराम करत होतो तर वीज गेली आणि ज्या हॉटेलमध्ये होतो ते हलल्यासारखे वाटायला लागले. भीतीने पोटात गोळा उठला. आधी बायकोला खाली पाठवले. चप्पल न घालताच ती खाली आली तेव्हा हॉटेलच्या लिफ्टमध्ये पर्यटक ग्रुपमधल्या अनेक बायका अडकल्या होत्या. जागच्याजागी पळापळ सुरू होती. कारण, जमीन हलत असल्याने धावताही येत नव्हते. बाजूच्या इमारती हलत असल्याचे दृश्य असतानाच अचानक एक इमारत कोसळली आणि डोळ्यादेखत रस्त्यावरून मोटरसायकलने येणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराला कोसळत्या इमारतीने कवेत घेतले.
याआधी कधी असे प्रसंग पाहिलेले नव्हते. यावेळी मात्र पहिल्यांदाच २५-३० भूकंपाचे हादरे अनुभवले. पशूपतीनाथ मंदिराजवळच्या हॉटेलजवळील मोकळ्या पटांगणावर आमच्यासह इतरही राज्यातील तब्बल चार-पाच हजार पर्यटक जमले होते. यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश होता. ९ ते १० अंश सेल्सिअस तापमानात आम्ही रात्र काढली. सकाळी रस्ता मोकळा झाला आणि आम्हीही श्वास मोकळा केला. रविवारी लुम्बिनीजवळ थांबलो आणि आता नेपाळची सीमा पार करून भारतात प्रवेश केला आहे.
गुरुदेव रामटेके, पर्यटक

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
K North Division office, K North Division office inauguration, mumbai, K North Division office mumbai,
मुंबई : के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत उद्घाटन
Story img Loader