फोन लागत नाही.. लागलाच तर बोलणं होण्याआधीच संपर्क तुटतोय.. कुठून माहिती मिळेल अशी आशा नाही.. रविवार संध्याकाळपर्यंत मुंबईत कामासाठी आलेल्या नेपाळमधील कष्टकऱ्यांची मानसिक अवस्था अशीच काहीशी होती. शनिवारी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची माहिती वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचली. पण रोजगारासाठी मुंबापुरीतील नेपाळी कष्टकऱ्यांना मात्र त्यांच्या कुटुंबाच्या कुशलतेची वार्ता पोहोचेपर्यंत रविवार संध्याकाळची वाट पाहावी लागली. भूकंप होऊन दोन दिवस उलटले असूनही भूकंपाचा धोका टळला नाही. त्यामुळे डोक्यावरची भीतीची टांगती तलवार अजूनही कायम असल्याचे मुंबईतील नेपाळी तरुण सांगतात.
स्वप्नाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचे आकर्षण भारतातल्या खेडय़ापाडय़ातील लोकांसोबतच नेपाळमधील नागरिकांनाही आहे. त्यामुळेच नेपाळमधून कित्येक जण रोजगाराची सोय करण्यासाठी मुंबईमध्ये येऊन धडकतात. याच नगरीमध्ये मोलमजुरी करण्यात त्यांचे आयुष्य जाते. इमारतींमध्ये राखणदार, चायनीज पदार्थाचे ठेले, फास्ट फूड जंक्शन अशा ठिकाणी हे कामगार काम करतात. शनिवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने सरळ रेषेत चालणाऱ्या या मजुरांचे आयुष्यही हादरवले. डोंबिवलीमध्ये इमारतीत राखणदार म्हणून काम करणारा नदिंद्रा माजीला नेपाळमधील भूकंपाची बातमी इमारतीतील सदस्याने कळवली. त्यानंतर त्याने घरच्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. फक्त भूकंप झाला आहे, एवढंच त्याला कळू शकत होतं, नक्की कोणत्या भागात भूकंप झाला आहे, हे कळत नव्हतं. ‘मी आई, बहिणी, मामा, शेजारी सर्वाशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. पण कोणाशीच संपर्क होत नव्हता,’ असं तो सांगतो. राखणदारीचं काम करणाऱ्या नदिंद्राच्या इतर सहा-सात मित्रांच्या घरच्यांची खुशालीही त्यांनी मिळविली. पण एका मित्राचे गाव मात्र काठमांडूच्या जवळ होते. त्यांच्याशी आतापर्यंत कोणाचाच संपर्क होऊ शकला नाही.
अंधेरीमध्ये इमारतीमध्ये राखणदारी करणाऱ्या जगतसिंगचा संपर्क त्याच्या घरच्यांशी रविवारी संध्याकाळी झाला. त्यांचे गाव भूकंपक्षेत्रापासून एक तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे गावाला भूकंपाचा जास्त धक्का न बसल्याचे तो सांगतो. अर्थात पण रविवार संध्याकाळी घरच्यांशी संपर्क होईपर्यंत त्याचा जीवही वरखाली होत होता. फास्ट फूड सेंटरमध्ये काम करणारा सुरेश दयालच्या गावातही भूकंपाच्या धक्क्याने फारसे नुकसान झाले नाही. पण त्यांच्या शेजारचे गाव मात्र भूकंपाचे बळी पडले. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर एक अख्खं गाव उद्ध्वस्त झाल्याचे कुटुंबाने त्याला सांगितले.
धोका अजून टळला नाही
शनिवारच्या प्रसंगानंतर आज दोन दिवस उलटून गेले असले, तरी भूकंपाचा धोका काही टळला नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही त्यांच्या मनात घरच्यांची काळजी कायम आहे. कित्येक ठिकाणी खबरदारी म्हणून आपल्या गरजेपुरते सामान घेऊन लोकांनी उघडय़ा मैदानांवर राहणे पसंत केले असल्याचे ते सांगतात. सध्या नेपाळचे सर्व लोकल नंबर बंद आहेत. पण काही भारतीय मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क नेपाळला लागत असल्याने मध्येच कधीतरी दोन-तीन मिनिटांसाठी त्यांचा घरच्यांशी संपर्कहोतो. त्यामुळे जोपर्यंत वातावरण शांत होत नाही, तोपर्यंत या कष्टकऱ्यांच्या मनातील भीतीचं सावट कायम असेल हे नक्की.
चिंता सतावतेय, भीतीने ग्रासलेय..
फोन लागत नाही.. लागलाच तर बोलणं होण्याआधीच संपर्क तुटतोय..
First published on: 28-04-2015 at 06:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal workers in mumbai worried about their families