सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून त्यांच्याद्वारे समाजहिताचे काम करणाऱ्या संस्थांना यथाशक्ती मदत मिळावी, या हेतूने ‘लोकसत्ता’ राबवीत असलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’पासून प्रेरणा घेत गेल्या वर्षांपासून नवरात्रोत्सवातही अशाच प्रकारचा उपक्रम नवी मुंबईतील एक संस्था राबवीत आहे.
नेरूळ येथील सेक्टर-२३ मधील उत्कर्ष मित्र मंडळ गेली चार वर्षे नवरात्रोत्सव साजरा करते. तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सव काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रम राबविल्यानंतर संस्थेच्या सभासदांना आपणही नवरात्र उत्सवादरम्यान एखाद्या संस्थेला सामूहिकरित्या निधी गोळा करून द्यावा, असे वाटले आणि त्यातून नवरात्र उत्सवातील या अनोख्या दानयज्ञाची सुरुवात झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील नागरिकांना या योजनेविषयी माहिती दिली. मदतीचे स्वरूप ऐच्छिक आणि यथाशक्ती स्वरूपाचे असेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. उत्सवाचा आनंद घेताना त्या बरोबरीनेच समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला साहाय्य करण्याच्या या उपक्रमास नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीस मदत देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार समितीचे अनिकेत आमटे यांना ३६ हजार रुपयांचा धनादेश समारंभपूर्वक देण्यात आला.
यंदा अनाथ मुलांचे पालनपोषण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या ‘सन्मती बाल निकेतनह्ण संस्थेस मदत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यंदा या दानयज्ञास गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी ‘वृत्तान्तह्णला दिली. येत्या १० ऑक्टोबर रोजी स्वत: सिंधुताई सपकाळ उत्कर्ष मित्र मंडळास भेट देणार असून त्या वेळी त्यांना किमान ५१ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवादरम्यान अशाप्रकारे किमान एका संस्थेला मदत देण्याचा ‘उत्कर्ष..’च्या कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.
नेरूळमधील ‘उत्कर्ष’च्या नवरात्रोत्सवात समाजस्नेही दानयज्ञ.!
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून त्यांच्याद्वारे समाजहिताचे काम करणाऱ्या संस्थांना यथाशक्ती मदत
आणखी वाचा
First published on: 05-10-2013 at 07:30 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nerul utakarsh pandal inspired by sarvakaryeshu sarvada