चिमणीचे घरटे आतून अतिशय उबदार असते. छान मऊ कापूस, तलम धागे आणि गवत यांचा बिछाना आत असतो. या घरटय़ात पिले अगदी सुखात वाढतात. मात्र.. या मऊमुलायम बिछान्याखाली काही काटेही असतात. पिलांचे वजन जसजसे वाढते तसतसे त्यांना खालचे काटे टोचू लागतात. अखेरीस टोचणे सहन न होऊन ही पिले धडपडत घरटय़ाच्या बाहेर येतात आणि लवकरच गगनभरारी घेतात. पिलांना स्वावलंबी बनविण्याचा हा अनोखा मार्ग माणसाने पक्ष्यांकडून शिकण्यासारखा आहे.
गोरेगाव, नागरी निवारा परिषद वसाहतीत राहणाऱ्या काही निसर्गप्रेमींना चिऊताईची काही घरटी पाहत असताना ही जाणीव झाली. विशेषत: लहान मुलांना झाली तर चिऊताईसारखे प्राणी तर सुरक्षित राहतीलच; माणसांमधील निसर्गप्रेमही वाढीस लागेल, या भावनेतून या मंडळींनी ‘साद-प्रतिसाद’ ही संस्था जन्माला घातली. संस्थेने गेल्या वर्षी ‘कृत्रिम घरटी स्पर्धा’ आयोजित केली. चिमण्यांसाठी आपल्या घरामध्ये घरटे बांधले तर दिवसभर ‘चिवचिव’ ऐकायला मिळेल, ‘एक घास चिऊचा’ भरवताना प्रत्यक्ष चिऊ दिसू शकेल, असा दुहेरी उद्देश यामागे होता. अधिक माहितीसाठी संदीप सावंत- ९८२१०३०८४१, निवृत्ती कुंभार- ९८२१३७०४४२ यांच्याशी संपर्क साधावा.