गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर सोनझरी तलावाकाठी पट्टेदार वाघाला गोळ्या घालून ठार केल्याची गंभीर दखल नेदरलॅंडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस व मनेका गांधी यांनी घेतली आहे. स्थानिक वन्यजीवप्रेमींनी यासंदर्भातील तक्रार या संस्थेकडे केल्यानंतर ही दखल घेतली गेली आहे.
गेल्या शनिवारी सोनझरी तलावाच्या काठावर पट्टेदार वाघाला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. प्रत्यक्षात नरभक्षक वाघाला गोळ्या घालण्याऐवजी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे, मात्र राज्यात मुंबई वगळता इतरत्र कुठेही रेस्क्यू सेंटर नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. यापूर्वीही चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघाला अशाच प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती गोंदियात झाल्याने संतप्त झालेल्या वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन मनेका गांधी व नेदरलॅंडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसकडे तक्रार दाखल केली. ई-मेल व्दारा ही तक्रार केल्यानंतर ती दाखल करून घेऊन आज मेलव्दारेच पोच पाठविण्यात आली आहे. वाघाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अंधारी फाऊंडेशन, वाईल्ड केअर, पृथ्वी मित्र निसर्ग संस्था, पीपल फॉर अॅनिमल, फ्रेन्डस ऑफ ताडोबा व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी या संस्थेचे सर्व सदस्य येथील भवानजीभाई शाळेत एकत्र आले होते. या सर्वानी मिळून आता वाघांच्या अस्तित्वासाठी लढाई सुरू केलेली आहे. राज्य शासन, तसेच वनखात्याविरोधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोकडे याचिका दाखल करून निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यात अभियान छेडण्याचा निर्णय स्थानिक वन्यजीवप्रेमींनी घेतला आहे.
यावेळी त्यांनी राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. यासोबतच गांधी चौकात एकत्र येऊन या घटनेचा शांततापूर्ण मार्गाने जाहीर निषेध केला. गोंदियाप्रमाणेच ब्रम्हपुरी वन विभागात काही वर्षांपूर्वी अशाच पध्दतीने वाघाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या सर्व घटनांमध्ये वाघ गावात येत नसून, माणूसच जंगलात जात असल्याने हल्ले होत आहेत. त्यातही वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने केंद्र शासनाने वाघ बचाओ मोहीम सुरू केली असतांना येथे राज्य शासन ऑपरेशन टायगर किलिंग राबविते, ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे वन्यजीवप्रेमींनी सांगितले. पर्यावरण, जंगले, वाघ व वन्यजीवांना सुरक्षित ठेवणे हे घटनेने दिलेले कर्तव्य आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे सुध्दा कोणत्याही वन्यजीवांना गोळ्या घालणे गुन्हा आहे. आज शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जंगल तोडून वाघांचे व वन्यजीवांचे अधिवास नष्ट करत आहोत. वाघ हा राज्याची व देशाची शान आहे. अशा प्रसंगी वाघांचा बचाव करण्याऐवजी त्यांचाच बळी देणे चुकीचे आहे, असे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे. यापुढे वन्यजीवांची अशी हत्या खपवून घेणार नाही, असा इशारा वन्यजीवप्रेमींनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा