मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडनजीक होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कृषी महाविद्यालयाच्या उभारणीमुळे ग्रामीण जनतेची विद्यानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या लौकिकाला झळाळी मिळणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री समर्थकांत उत्साहाचे वातावरण पसरले असून, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेने या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत यशवंतरावांच्याच कृपाशीर्वादाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कराडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वगळता बहुदा सर्वच शासकीय महाविद्यालय आहेत. मात्र, पाण्याचा सुकाळ आणि उत्तम शेतीक्षेत्र असलेल्या या साखर कारखानदारीच्या विभागात शासकीय कृषी महाविद्यालयाची उणीव भासत होती. यावर कृषी महाविद्यालयासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, युवानेते राहुल चव्हाण, डॉ. अतुल भोसले व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सततचा पाठपुरावा केला. दरम्यान, कराडच्या कृषी महाविद्यालयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये महाविद्यालयाची इमारत, कॅम्पससह अन्य बाबींवर चर्चा झाली. कराडला महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
या कृषी महाविद्यालय स्थापन करण्याच्या पाश्र्वभूमीवर जागेसंदर्भात कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे व पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सैदापूर, मुंढे येथील जागांना पसंती देऊन महाविद्यालयाच्या कामास हिरवा कंदील दाखवला. आता कृषी महाविद्यालयाची घोषणा झाल्याने प्रत्यक्ष महाविद्यालय उभारणीची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कृषीविषयक शिक्षणाची चांगली सोय व्हावी या हेतूने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला जागा उपलब्धतेची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून जागांची उपलब्धता असलेल्या ठिकाणची यादी मुख्यमंत्री कार्यालय आणि कृषी विद्यापीठांना देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना कृषी महाविद्यालयाची रचना, इमारत, जागांची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सैदापूर, मुंढे येथील जागांना पसंती दिली आहे.

Story img Loader