* यंदा ‘सवाई’ स्पर्धेच्या तिकिटांची विक्रीच नाही
* सहभागी संस्था, मान्यवरांनंतर शिल्लक राहिल्यास तिकिटे विकणार
गेली २५ वर्षे २५ जानेवारीची रात्र आणि ‘सवाई’ एकांकिका स्पर्धा हे समीकरण नाटय़रसिकांच्या मनात फिट्ट बसलेले आहे. त्या आधी तिकीट विक्रीची तारीख जाहीर झाल्यानंतर त्याच्या आदल्या रात्रीपासून तिकिटाच्या रांगेत उभे राहणे, रात्रभर गप्पा मारणे, पहाटे पहाटे चहाच्या वाफाळत्या कपासह झोपेला अलविदा करणे, या सगळ्या वातावरणाला यंदा नाटय़रसिक मुकणार आहेत. गेल्या वर्षी ‘सवाई’च्या तिकीट विक्रीच्या वेळी झालेला अभूतपूर्व गोंधळ लक्षात घेऊन यंदा चतुरंग प्रतिष्ठानने सवाई स्पर्धेची तिकिटे न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी उत्साहाने या स्पर्धेला उपस्थित राहणारे प्रेक्षक यंदा स्पर्धेला मुकणार आहेत.
गेल्या २५ वर्षांत ‘सवाई’ने नाटय़रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. काही वर्षांपूर्वी तिकीट विक्रीच्या दिवसाच्या आदल्या रात्रीपासून तिकिटासाठी रांग लावण्याचा उपक्रम सगळ्या तरुण मुलांनी सुरू केला. त्या वेळी आम्हालाही त्याचे कौतुक वाटले होते, असे ‘चतुरंग’च्या विद्याधर निमकर यांनी सांगितले. त्या वेळी ‘चतुरंग’च्या कार्यकर्त्यांनी वेळप्रसंगी खाऊ वाटण्याचे कामही केले होते. मात्र आदल्या रात्रीपासून उभे राहणारे तरुण गेल्या काही वर्षांत आदल्या दिवशी सकाळपासूनच रांग लावायला लागले.
गेल्या वर्षी या प्रणालीमुळे तिकीट विक्रीच्या वेळी दोन गटांत चांगलीच जुंपली होती. त्या वेळी आम्हाला विचार करायला लागला की, अशा प्रकारे तिकीट विक्री करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून आम्ही तिकीट विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निमकर म्हणाले.
तिकीट विक्री ठेवण्यापेक्षा आम्ही सहभागी संस्थांना त्यांच्या संघाप्रमाणे तिकिटे विकणार आहोत. तसेच नाटय़क्षेत्राशी निगडित ज्यांना ‘सवाई’ला येण्याची इच्छा आहे, मात्र दरवर्षी रांगेत उभे राहणे शक्य होत नाही, त्यांना यंदा तिकिटे दिली जातील. त्यातून काही तिकिटे शिल्लक राहिल्यास सविस्तर जाहिरात देऊन आम्ही त्यांची विक्री करू, असे निमकर यांनी सांगितले.
‘ब्लॅक’लाही आळा बसेल
आधी तिकीट विक्री ज्या पद्धतीने होत होती, त्यामुळे ‘सवाई’ची तिकिटे ब्लॅकने विकली जात असल्याचेही आढळले होते. ज्या गणेश सोळंकी यांच्या नावाने स्पर्धा चालवली जाते, त्यांच्या मुलालाही एकदा ‘ब्लॅक’ने तिकीट विकत घेण्याची वेळ दुर्दैवाने आली होती. आमच्या कार्यकर्त्यांनाही तिकिटे मिळत नाहीत. मग आम्ही सध्या जी पद्धत अवलंबत आहोत, त्यामुळे ‘ब्लॅक’लाही आळा बसेल, असे निमकर यांनी स्पष्ट केले.