प्रचंड गाजावाजा करीत आणि अमिताभ बच्चन, राज ठाकरे, सलमान खान आदी धुरंधरांना प्रसिद्धीसाठी पाचारण करीत महेश मांजरेकर यांनी प्रदर्शित केलेला ‘कोकणस्थ’ मनाला भावणार नाही. ‘विरुद्ध’ या हिंदी चित्रपटाची कथा उचलून त्याभोवती मराठी चित्रपट तयार करण्याचा मांजरेकर यांचा अट्टहास ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ भरण्यासारखा आहे..
तुम्ही अमिताभ बच्चन यांचा ‘विरुद्ध’ बघितलात? मग सचिन खेडेकर यांचा ‘कोकणस्थ’ नाही पाहिलात तरी चालेल. कारण दोन्ही चित्रपटांची कथा सारखीच आहे. मात्र ज्यांनी ‘विरुद्ध’ हा चित्रपट पाहिला नाही, त्यांच्यासाठी चित्रपटाची थोडक्यात कथा म्हणजे.. नोकरीतून निवृत्त होऊन स्वकष्टार्जित बंगल्यात निवांत आयुष्य जगणाऱ्या रामचंद्र गोखले (सचिन खेडेकर) आणि त्यांची पत्नी (सोनाली कुलकर्णी) या जोडप्याच्या आयुष्यात अचानक एक प्रसंग घडतो. त्यांच्या आधारपणाची काठी त्या प्रसंगामुळे त्यांच्या हातातून निसटते. मग पुढे या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यांना शासन देण्यासाठी म्हणून हे वृद्ध जोडपे संघर्ष करते.
पण या सगळ्या कथेला चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करताना महेश मांजरेकर यांचे काहीतरी चुकले आहे. चित्रपटाचा वेग मध्यंतरापर्यंत अत्यंत धीमा आहे. त्यानंतरही चित्रपट फार काही वेग पकडत नाही. पण किमान काहीतरी घटना घडत राहतात आणि प्रेक्षकाचा रस थोडाबहुत कायम राहतो.
चित्रपट तांत्रिकदृष्टय़ा, म्हणजे चित्रीकरणाच्या दृष्टीने, अत्यंत सुबक बनला आहे. पण काही मुद्दे खटकत राहतात. मुख्य म्हणजे चित्रपटाचे नाव ‘कोकणस्थ’ ठेवण्यामागचा उद्देश कळलेला नाही. या जोडप्यावर जो प्रसंग गुदरतो, तो कोणाच्याही आयुष्यात घडला, तरी त्या व्यक्ती तशाच वागतील. त्यासाठी ‘ताठ कणा हाच बाणा’ असण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाने (रोहन तळवलकर) स्वित्झर्लण्डमध्ये एका मुलीशी लग्न केले आणि तो तिला घेऊन एक दिवस अचानक घरी थडकला, तर कोकणस्थच सोडा, कोणाच्याही घरी काय गहजब होईल, याची कल्पना दिग्दर्शक किंवा कथाकाराला नसावी, असे दिसते. किंवा मग त्यातून विशिष्ट कुटुंबांतील समजूतदारपणा वगैरे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा डाव असावा.
दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाला ‘कंटिन्युटी’ जपता आलेली नाही. रामचंद्र गोखले यांना त्यांच्या घरी भेटायला आलेल्या वकिलाला गोखले यांच्या अंगणात गॅरेज चालवणारा गौतम पगारे (उपेंद्र लिमये) रक्त येईस्तोवर मारतो. मात्र त्यानंतर लगेचच असलेल्या न्यायालयातील प्रसंगात वकिलाच्या डोक्यावर साधी बँडेजची पट्टीही दिसत नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आवारात विद्याच्या (वैदेही परशुरामी) हातात दुपटय़ात गुंडाळलेली तान्ही मुलगी न्यायालयात जाईपर्यंत चांगली वर्षांची झाली असते. अशा काही बारीकसारीक गोष्टी डोळ्यांना खटकतात. तसेच चित्रपटात किमान पन्नास वेळा गोखल्यांचा बंगला बाहेरून दाखवण्यातून दिग्दर्शकाला नेमके काय साध्य करायचे आहे, हेदेखील कळलेले नाही. न्यायालयात साक्ष देताना रोहनचा मित्र अचानक कसा पलटतो, याचेही स्पष्टीकरण आलेले नाही.
चित्रपट सुरू झाल्यानंतर पहिली वीस मिनिटे गोखले दाम्पत्य चहात साखर घेणे आणि पदार्थावर मीठ घेणे या मूलभूत गोष्टींमध्येच अडकली आहेत. याच दरम्यान यमक वगैरेंशी संबंध नसलेले एक गाणेही येते. अक्षय हरिहरन या संगीतकाराने गाणी बरी केली आहेत. पण त्याला मराठी भाषेचा गंध नसल्याने असेल बहुतेक, पण शब्दांमधील भाव पकडता आलेला नाही. चित्रपटभर गोखले दाम्पत्य एक तर प्रभातफेरीला तरी जात असते किंवा घरात झोपा तरी काढत असते. त्यांना दुसरा बिझनेसच दिला गेलेला नाही. आत्मारूपी रोहनच्या तोंडून या चित्रपटाची कथा सांगताना रोहनला दाक्षिणात्य पेहराव दिला आहे, ही गोष्टही खूप खटकते.
तरीही चांगल्या छायाचित्रणामुळे, रंगसंगतीमुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट ‘बघणेबल’ झाला आहे. सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही दृष्ट लागण्याइतकी चांगली कामे केली आहेत. नवोदित रोहन तळवलकर आणि वैदेही परशुरामी या दोघांना फार काम नाही. मराठी चित्रपटांत काम करण्याआधी वैदेहीने मराठी शिकून घेणे गरजेचे आहे. नाहीतर मराठीतील ‘कतरीना कैफ’ होण्याचा धोका तिच्या वाटय़ाला येईल. रोहनने बरे काम केले आहे. पण लहानशा भूमिकेत उपेंद्र लिमये आणि विजय कदम भाव खाऊन गेले आहेत.
एका हिंदी चित्रपटाचे मराठी रूपांतर पाहण्याचा सोस असेल, तर नक्कीच ‘कोकणस्थ’ला जा! अन्यथा घरी बसून आराम करणे, तब्येतीला चांगले असते.
द ग्रेट मराठा एण्टरटेन्मेण्ट निर्मित व स्टार प्रवाह प्रस्तुत कोकणस्थ
कथा व दिग्दर्शन – महेश मांजरेकर
संवाद – संजय पवार
गीते – संदीप खरे
संगीत – अक्षय हरिहरन
छायालेखन – अजित रेड्डी
कलाकार – सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, रोहन तळवलकर, वैदेही परशुराम, जितेंद्र जोशी, विद्याधर जोशी, विजय कदम आदी

Story img Loader