होणार होणार म्हणता म्हणता ठाणे रेल्वे स्थानकात सहा मीटर रुंदीचे आणखी दोन पादचारी पूल उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून नववर्षांच्या दुसऱ्याच दिवशी सुमारे आठ कोटी रकमेच्या या पुलाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील अतिशय गर्दीच्या अशा या स्थानकात सद्यस्थितीत १२ मीटर रुंदीचा एक तर सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल अस्तित्वात आहेत. यामध्ये आणखी दोन पुलांची भर पडणार असल्याने फलाट ते सॅटिस हा प्रवास आता सुखकर होण्याची चिन्हे आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे सहा लाख प्रवाशांचा राबता असतो. या भागातील प्रवाशांचा राबता लक्षात घेता ठाणे महापालिकेने सॅटिसवर छत उभारण्याचा निर्णय घेतला असून सॅटिसपासून स्थानकात शिरण्यासाठी लिफ्टही बसविली जाणार आहे. असे असले तरी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांची संख्या लक्षात घेता फलाटापासून सॅटिसपर्यंतचा प्रवास प्रवाशांसाठी नेहमीच त्रासदायक ठरत असे. वर्षभरापूर्वी या स्थानकात कल्याण आणि मुलुंडच्या दिशेने सहा मीटरचे दोन पादचारी पूल होते. तसेच मुलुंडच्या दिशेने उभारण्यात आलेल्या सहा मीटरच्या पादचारी पुलास चार मीटर रुंदीचा एक लहानगा पूलही वापरात आहे. मात्र, या पुलाची अवस्था वाईट असल्याने ठाणे महापालिकेने या ठिकाणी सहा मीटर रुंदीच्या पुलाच्या उभारणीसाठी रेल्वेला निधी देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात १२ मीटर रुंदीचा एक तर सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पुल उभारले जावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी रेल्वे मंत्रालयापुढे मांडला होता. यापैकी १२ मीटर रुंद असलेला पादचारी पूल कार्यान्वित झाला असला तरी आणखी दोन लहान पादचारी पुलांची मांडणी कागदावर होती. वर्षभरापूर्वी कल्याणच्या दिशेने उभारण्यात आलेल्या १२ मीटर रुंदीचा पादचारी पूल सॅटिसला जोडण्यात आल्याने या पुलाचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. या मोठय़ा पुलामुळे जुन्या पादचारी पुलावरील भार कमी झाला असला तरी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी आणखी पूल उभारले जावेत, या संजीव नाईक यांच्या मूळ प्रस्तावास अखेर रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.
आणखी दोन पूल १० महिन्यांत
दरम्यान, रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा एक भाग म्हणून चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता आणखी दोन लहान पादचारी पूल उभारले जावेत, अशा स्वरूपाचा प्रस्ताव यापुर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाची नेमकी अंमलबजावणी कधी होणार याविषयी मात्र प्रश्नचिन्ह होते. अखेर नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात यापैकी कल्याणच्या दिशेकडील सहा मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या दोन्ही पादचारी पुलांच्या उभारणीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून यासंबंधीच्या निविदा काढण्यात आल्याने प्रत्यक्ष पुलाच्या बांधणीतील मोठा अडसर दूर झाल्याचे चित्र आहे. निविदा प्रक्रियेनंतर दहा महिन्यांत पुलाची बांधणी व्हावी, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. तरीही रेल्वेचा एकूण कारभार पाहता या पुलाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब आहे.
ठाणे स्थानक ते सॅटिस प्रवास सुसाट
होणार होणार म्हणता म्हणता ठाणे रेल्वे स्थानकात सहा मीटर रुंदीचे आणखी दोन पादचारी पूल उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून नववर्षांच्या दुसऱ्याच
First published on: 31-12-2013 at 07:13 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New breach between thane station to satis