सव्वा वर्षांवर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून वर्धेत काँग्रेसचे दिग्गज नेते दत्ता मेघे यांनी पुत्र सागर मेघेच्या उमेदवारीसाठी रणशिंग फुंकून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आणला आहे. तर अन्य मतदारसंघातही काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांमधील दावेदारीचा संघर्ष छेडला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अचानक सक्रिय झाले असून जनसंपर्कासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात विविधांगी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वचनपूर्तीचा पाठपुरावा करताना धर्मनिरपेक्ष धोरण, माहितीचा अधिकार, ग्रामसडक योजना, धान्यपुरवठा, आधार, थेट सबसिडी अन्य कामांचा दाखला दिला आहे तर अजित पवारांनी दुष्काळग्रस्त जनतेविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्य करून राज्य सरकारच्या संवेदनहीनतेवर टीकेची झोड उठविली आहे. सिंचन घोटाळा, शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्राची झालेली घसरण, कायदा-सुव्यस्थेचा बोजवरा, प्राध्यापकांचा लांबत चाललेला संप, एलबीटीवरून उद्भवलेली आणीबाणीची स्थिती या मुद्दय़ांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. अकोला आणि भंडारा अशा दोन जिल्ह्य़ांमध्ये फडणवीसांनी पक्षसंघटनेचा आढावा घेऊन प्रदेश शाखेवरील पकड मजबूत करण्यासाठी पावले टाकली आहेत. मुंबईतील जंगी स्वागत आटोपून विदर्भात आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सर्वच जिल्ह्य़ांचे झंझावाती दौरे सुरू केले असून त्यांचे लक्ष्य अर्थातच सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आहे. याउलट माणिकरावांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवरच थेट नेम साधल्याने विदर्भातील राष्ट्रवादीच्या वर्तुळात अस्वस्थता आहे. दोन्ही प्रदेशाध्यक्षांपुढे विधानसभेत आपापल्या पक्षांना विजय मिळवून देण्याचे लक्ष्य असल्याने दोन प्रदेशाध्यक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
 दुसरीकडे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दोन टप्प्यातील दौऱ्यांनी विदर्भात चैतन्य आल्यासारखे जाणवत असले तरी विदर्भात मनसेजवळ मते खेचणारा चेहेरा नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेचे विदर्भातील अस्तित्व भाजपने मान्य केले असले तरी नागपूर महापालिका आणि अन्य जिल्ह्य़ांमधून शिवसेनेला सुरूंग लावण्याच्या भाजप नेत्यांच्या प्रयत्नांनी सेनेचे नेते नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर येणाऱ्या काळात विदर्भातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होईल.
निवडणुकांसाठी तिकीट वाटपाचे नियोजन दोन्ही प्रदेशाध्यक्षांपुढील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. नागपुरातून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी लढणार असल्याने त्यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू असतानाच तरुण नेतृत्त्व राजेंद्र मुळक यांचे नाव पुढे येऊ लागल्याने विद्यमान खासदार विलास मुत्तेमवारांना दिल्लीतील खास वजन वापरावे लागेल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे वर्धेत मेघे-प्रभा राव यांच्यातील पूर्वकाळच्या वर्धा मतदारसंघावरील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षांची धार दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली असून दोन्ही घराण्याचे राजकीय वारस सामोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रभा राव आता हयात नाहीत. परंतु, पारंपरिक मेघेविरोध त्यांची कन्या चारुलता राव-टोकस यांनी पुढे रेटला असून वर्धेतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या वर्धेतील वचनपूर्ती मेळाव्याच्या निमित्ताने दत्ता मेघे यांनी त्यांच्या मनातील मळमळ  प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीतच अक्षरश: बाहेर पडली. मेघेंचे कट्टर विरोधक व दिवं. प्रभा राव यांचे निकटस्थ नातेवाईक रणजित कांबळे हेदेखील व्यासपीठावर हजर होते. त्यांनी मेघेविरोधात चकार शब्दही काढला नाही. परंतु, सागर मेघेंच्या तिकिटासाठी दत्ता मेघे आतापासूनच सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत या मेळाव्यातून मिळाले. मेघे-प्रभा राव गटातील सुंदोपसुंदीची संपूर्ण कल्पना काँग्रेसश्रेष्ठींना आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी  जिल्हा समिती कांबळेंकडे, तर शहर कॉंग्रेस समिती खासदार मेघेंकडे, अशी स्पष्ट वाटणी प्रदेश समितीने करून दिली आहे. परंतु, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर गटबाजी आणखी तीव्र होणार आहे.
नागपुरात भाजपची नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली असून कार्यकारिणीतील पदांवरून छुपा असंतोष धुमसत आहे. वाडय़ावरच्या चाबकाच्या धाकाने पदाधिकारी जाहीरपणे बोलणे टाळत असून आता प्रदेशाध्यक्षपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान त्यांच्याकडे अप्रत्यक्ष कागाळ्या सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धुमसणाऱ्या असंतोषातून मार्ग काढून योग्य उमेदवारांना तिकीट वाटप आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांचीच निवड करण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीसांना पेलावे लागणार आहे.

Story img Loader