पुणे लोकसभा मतदारसंघातून निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह दोन विद्यमान, दोन माजी आमदार तसेच पक्षप्रवक्ते आदी सात-आठ मंडळी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून पुण्यात आलेल्या निरीक्षकांकडे या नावांचा आग्रह मंगळवारी विविध गटांकडून धरण्यात आला.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील उमेदवाराच्या नावासंबंधी चाचपणी करण्याकरिता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक केवलसिंग धिल्लन मंगळवारी काँग्रेस भवनात आले होते. पक्षाचे आजी-माजी आमदार, तसेच नगरसेवक, पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष आणि विविध आघाडय़ांच्या अध्यक्षांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. या सर्वाची धिल्लन यांनी वैयक्तिक भेट घेऊन त्यांची मते ऐकली, तसेच पुण्यातून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत चर्चाही केली. प्रत्येकाची भेट वैयक्तिक स्वरुपात घेतली जात होती आणि चर्चेसाठी आलेल्या पदाधिकाऱ्याने दिलेली माहिती धिल्लन यांचे स्वीय सहायक लिहून घेत होते.
खासदार कलमाडी पुण्यातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या समर्थकांनी धिल्लन यांच्याकडे कलमाडी यांच्या नावाचा आग्रह धरला. कलमाडी यांना पक्षात घ्यावे व त्यांनाच पुण्यातून उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी कलमाडी समर्थकांनी केली. कलमाडी यांच्याबरोबरच आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे तसेच माजी आमदार चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ आणि उपमहापौर दीपक मानकर हेही पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आमदार विनायक निम्हण आणि शहराध्यक्ष अभय छाजेड लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले.
‘कलमाडींबाबत श्रेष्ठींचा निर्णय’
कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यामुळे काँग्रेसची प्रतीमा मलिन झाली आहे. पक्षाची प्रतिमा सुधारायची असेल, तर लोकसभेसाठी पुण्यात नवीन चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी धिल्लन यांच्याकडे केली. ‘काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि पक्षात लोकशाही आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. कलमाडी यांच्यासंबंधीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील’ असे धिल्लन यांनी या वेळी सांगितले.
हा आदेशाचा भंग- जोशी
पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. कलमाडी यांना पुन्हा पक्षात घेण्याची मागणी करणे म्हणजे पक्षादेशाचाच भंग आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मोहन जोशी यांनी या वेळी व्यक्त केली. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले आमदार शरद रणपिसे यांनी मात्र, कलमाडी काँग्रेस बाहेर असल्याने त्या विषयावर प्रतिक्रिया नाही, अशी भूमिका घेतली. निवडणुकीसाठी मी तीव्रतेने इच्छुक आहे, असेही ते म्हणाले.
पक्षाने उमेदवार देताना पुणेकरांचे म्हणणे ऐकून घ्यावे. चांगला आणि सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी प्रवक्ते गाडगीळ यांनी केली. तर, मी ज्येष्ठ सदस्य आहे आणि इच्छुक आहे. लोकसभेसाठी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असे माजी आमदार चंद्रकांत छाजेड म्हणाले. काँग्रेससाठी मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन गटांमध्ये धक्काबुक्की
निरीक्षक धिल्लन यांना भेटण्यासाठी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांसह जात असताना तेथे कलमाडी यांचेही समर्थक मोठय़ा संख्येने जमले होते. पक्षाचे गटनेता अरविंद शिंदे हेही तेथे उपस्थित होते. दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला. याच वेळी शिंदे यांना कोणीतरी ढकलले आणि वादावादी सुरू झाली. वादावादीतून लगेचच दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

दोन गटांमध्ये धक्काबुक्की
निरीक्षक धिल्लन यांना भेटण्यासाठी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांसह जात असताना तेथे कलमाडी यांचेही समर्थक मोठय़ा संख्येने जमले होते. पक्षाचे गटनेता अरविंद शिंदे हेही तेथे उपस्थित होते. दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला. याच वेळी शिंदे यांना कोणीतरी ढकलले आणि वादावादी सुरू झाली. वादावादीतून लगेचच दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्कीही झाली.