पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाचा लोकार्पण सोहळा १ जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्याच्या जोरदार हालचाली नगरपालिकेत सुरू आहेत. यादरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी सरकारचा झालेला दारुण पराभव लक्षात घेता, आता तरी राज्यातील आघाडी सरकार रस्त्यावर चालणाऱ्या पनवेलकरांच्या मुख्य मागण्यांकडे लक्ष केंद्रित करेल का, हा प्रश्न सामान्य पवनलेकरांना पडला आहे. तीन महिन्यांनंतर येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका समोर ठेवून तरी पनवेलकरांच्या रोज जगण्याच्या कामोठे बससेवा, पनवेलचे सरकारी रुग्णालय यासारख्या समस्या सोडविण्यासाठी आता तरी मुख्यमंत्री पुढाकार घेतील का, हा प्रष्टद्धr(२२४)न सामान्यांना पडला आहे.
पनवेलच्या नाटय़गृहाचे रखडलेले बांधकाम कसेबसे पूर्ण झाले. काही अंशी पालिकेचा सरकारी लालफितीमधील कारभार, विरोधकांचे राजकारण आणि राजकीय प्रतिष्ठा यामध्ये हे नाटय़गृह अडकले होते. गेल्या महिन्यात या नाटय़गृहाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या कचाटय़ात हे नाटय़गृह खुले होऊ शकले नाही. हे नाटय़गृह खुले करण्यासाठी पालिकेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नाटय़गृहाचे उद्घाटन व्हावे, अशी इच्छा माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर यांची आहे. या नाटय़गृहामुळे पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागणार आहे. मात्र या सांस्कृतिक चळवळीप्रमाणे पनवेलकरांच्या आणखी महत्त्वाच्या समस्या सरकार दरबारी खीळ ठोकून उभ्या आहेत. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेलमध्ये दोन वर्षांपासून बांधकामासाठी रखडलेले सरकारी रुग्णालय आणि कामोठे येथील एनएमएमटीची बससेवा या दोन मुख्य समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवाव्यात, अशी सामान्य पनवेलकरांची मागणी आहे.
पनवेलच्या ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम हे शेवटच्या टप्प्यात आहे. किमान ३० खाटांचे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात १० जूनपर्यंत सुरू करता येईल. रुग्णालय हे १०० खाटांचे आहे. मात्र त्यासाठी अजून दोन वर्षे लागणार आहेत. सध्या इमारतीमध्ये ३० खाटांचे रुग्णालय आणि शवागाराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास सरकारी दरात येथे सामान्यांना सेवा मिळणार आहे.
असाच प्रश्न कामोठे शहरातील बससेवेचा आहे. शहरातील स्थानिक तीन आसनी रिक्षाचालकांच्या विरोधामुळे कामोठे शहरातील एनएमएमटीची बससेवा काही वर्षांपूर्वी ठप्प झाली. पोलीस आणि एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांनी ही बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या या लोकहिताच्या निर्णयाला मुहूर्त मिळत नाही. ही बससेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा कळंबोली, तळोजा, कामोठे व खांदेश्वर शहरातील हजारो प्रवाशांना होणार आहे. मात्र हे दोनही लोकहिताचे निर्णय राजकीय, सरकारी इच्छाशक्तीमध्ये अडकले आहेत. लोकहितासाठी ताठर निर्णय क्षमता नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हे प्रश्न सोडवावेत, अशी पनवेलकरांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी कामोठे बसमधून प्रवास केल्यास झेड प्लस सुरक्षेत ही बससेवा सुरू होईल अशासाठी काही कॉंग्रेसींनी पुढाकार घेतल्याचे कळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा