ठाण्यातील राम गणेश गडकरी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या दोन नाटय़गृहांसोबत आता कळव्यातही नवे नाटय़गृह उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कळव्यातील सुमारे १४ हजार चौरस मीटरच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भल्या मोठय़ा भूखंडाच्या आरक्षण बदलास अखेर राज्याच्या नगर विकास विभागाने हिरवा कंदील दाखविला असून यामुळे मैदानाच्या जागेवर आता नाटय़गृह उभे राहू शकणार आहे. कळवेकरांच्या मनोरंजनासाठी यापूर्वी साधे चित्रपटगृहही अस्तित्वात नव्हते. या आरक्षण बदलामुळे मुंब्रा-कळव्यातील रहिवाशांना नाटय़गृह उपलब्ध होऊ शकणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कळव्यात नाटय़गृह उभारणीचा प्रस्ताव पुढे आला होता. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडला असता सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मागे ठेवला. त्यानंतर या प्रस्तावाला ९० दिवसांचा कालखंड पूर्ण होताच राजीव यांनी आपल्या अधिकारात तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला. ठाणे शहर आणि घोडबंदर पट्टय़ातील रहिवाशांसाठी ठाणे महापालिकेने यापूर्वी दोन नाटय़गृह उभारले आहेत. गडकरी नाटय़गृहामुळे घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहास रसिकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याविषयी सुरुवातीला वेगवेगळे तर्क लढविण्यात येत होते. मात्र, गेल्या वर्षभरात डॉ. घाणेकर नाटय़गृहातील प्रयोगांनाही रसिकांची चांगली गर्दी होत आहे. या पाश्र्वभूमीवर कळव्यात नाटय़गृह उभारून तेथील रहिवाशांना मनोरंजनासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारून दिले जावे, अशी मागणी होती.
आरक्षणाचा तिढा सुटला
दरम्यान, कळव्यातील नाटय़गृह नेमके कोठे उभारले जावे, हा प्रमुख प्रश्न मात्र अनुत्तरित होता. यासाठी कळव्यात मैदानासाठी आरक्षित असलेल्या सुमारे १४ हजार चौरस मीटरच्या एका भूखंडाची निवड करण्यात आली होती. मात्र, मैदान तसेच उद्यानाच्या आरक्षण बदलास राज्य सरकारची मंजुरी बंधनकारक असते. त्यानुसार महापालिकेने आरक्षण बदलाचा एक प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी पाठविला होता. मैदानाचे आरक्षण बदलून सुमारे १२ हजार ७०० चौरस मीटरच्या भूखंडांवर नाटय़गृहाचे नवे आरक्षण करण्यास नगर विकास विभागाने मंजुरी दिल्याची माहिती कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. याशिवाय सुमारे १३०० चौरस मीटरच्या भूखंडावर पंप हाउससाठी मान्यता देण्यात आली आहे. या आरक्षण बदलामुळे कळव्यात नाटय़गृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ‘रिक्रीएशनल ग्राउंड’साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नाटय़गृह उभारण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होत असला तरी मैदानासाठी मोठय़ा क्षेत्रफळाच्या नव्या भूखंडांचा शोध महापालिकेस करावा लागणार आहे. मूळ विकास आराखडय़ात अशा प्रकारचे आरक्षण असलेले आणखी काही भूखंड उपलब्ध असून त्यापैकी काहींवर अतिक्रमण झाल्याची माहिती नगर विकास विभागातील सूत्रांनी दिली.

Story img Loader