नवउद्योजकांना वाव देण्यासाठी आयआयटी मुंबईत सातत्याने विविध प्रयोग सुरू असतात. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेनरशिप’ (साइन)तर्फे संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध प्रयोग आणि नवउद्योजकांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमामध्ये आयआयटी मुंबईची माजी विद्यार्थी संघटना आणि साइन या दोघांनी मिळून नव उद्योजकांना वाव देण्यासाठी संयुक्त समितीची स्थापना केली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन उद्योगांना वाव देण्यासाठी आयआयटी मुंबईतर्फे ‘साइन’ची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेलाही आमंत्रित करण्यात आले होते. माजी विद्यार्थी संघटना आणि साइन यांनी एकत्र येऊन काम केल्यास अधिक चांगले उद्योजक मिळू शकतील, अशी आशा व्यक्त करत दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन ‘आयआयटी माजी विद्यार्थी आणि साइन कमिटी फॉर आंत्रप्रेनर्शिप डेव्हलपमेंट’ची स्थापना केली. या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या माध्यमातून गेल्या १० वर्षांत सुमारे ५० कंपन्या उभ्या राहिल्या असून यशाचा हा आलेख उल्लेखनीय असल्याचे मत आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी व्यक्त केले. आता माजी विद्यार्थी संघटनेशी झालेल्या करारामुळे हा आलेख आणखी वाढेल, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली. या दोन संस्थांच्या सहकार्यामुळे नवउद्योजकांना अधिक चांगले व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक परेश वोरा यांनी व्यक्त केली.
दिवसभर रंगलेल्या या कार्यक्रमात ‘साईन’च्या माध्यमातून साकारल्या गेलेल्या कंपन्यांमधील काही उत्पादनांची झलकही उपस्थितांना पाहवयास मिळाली. यामध्ये सौरऊर्जा उत्पादने, मानवरहीत विमान, रोबो, इलेक्ट्रीक ट्रीक, एक्स्प्रेस बाइक वॉश आदी उत्पादनांचा समावेश होता. याचबरोबर ‘शादी डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम मित्तल, एचडीएफसी स्टँडर्ड लाइफचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सातवलेकर आदींनी मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा