बेस्ट फाईव्ह, श्रेणीसुधार योजना व एटीकेटी सुविधा ही यापूर्वीची वैशिष्टय़े कायम ठेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मार्च २०१० पासून सहाही विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘सर्वोत्तम-५’ (बेस्ट फाईव्ह) योजना लागू करण्यात आली आहे. ज्या पाच विषयांची टक्केवारी अधिक असेल, ती गुणपत्रिकेत नमूद केली जाते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर राज्य मंडळातील विद्यार्थ्यांनाही फायदा मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे.
दहावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी कमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण होतील, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ‘एटीकेटी’ची सुविधा २००९-१० सालापासून देण्यात आली आहे. त्यामुळे मार्च २०१३ची परीक्षा देऊन जास्तीत जास्त २ विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी ही सुविधा लागू असेल. या सवलतीसह अकरावीत मिळणारा प्रवेश हा तात्पुरता असेल. संबंधित विद्यार्थ्यांला अकरावीत शिकत असताना एटीकेटी मिळालेला विषय घेऊन ऑक्टोबरमध्ये मंडळाच्या परीक्षेला बसणे अनिवार्य राहील. यातही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला मार्च २०१४ मध्ये परीक्षेची शेवटची संधी राहील. त्यातही उत्तीर्ण न झाल्यास अकरावीचा प्रवेश रद्द करण्यात येईल.
परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देणारी श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना मार्च २००८ पासून लागू करण्यात आली होती. त्यात यावर्षी बदल करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना ऑक्टोबर २०१३ व मार्च २०१४ च्या परीक्षेला बसण्यासाठी दोनवेळा संधी देण्यात येणार आहे. एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेला नियमित विद्यार्थीच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारले जाईल.
२७ जूनपर्यंत मुदत
यावर्षीच्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सोय मंडळाने विद्यार्थ्यांना प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्याच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत ४०० रुपये शुल्क देऊन घ्यावी लागेल. ही प्रत मिळाल्यापासून पाच दिवसात विहित शुल्क भरून व विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. मार्च २०१३ ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याकरता २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा